Thursday, June 25, 2009

एकटा जीव

२५ जून २००९-मुंबई वृत्तान्त-पान १

एकटा जीव’ हाऊसफुल्ल! सातव्या आवृत्तीचे आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी
मराठी रंगभूमीवर ‘विच्छा माझी पुरी करा’या नाटकाद्वारे नवा इतिहास घडविणाऱ्या आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वत:ची शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ आत्मचरित्रालाही वाचकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभतो आहे. उद्या २५ जून रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे.
चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या अनिता पाध्ये यांनी दादांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्राचे शब्दांकन केले असून पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. त्यानंतरच्या चार आणि गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या सर्व आवृत्त्या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. मुंबईत होणारा हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ मिमिक्री कलाकार सुदेश भोसले हे दादांच्या काही आठवणी सांगणार असून दादांच्या आवाजात या पुस्तकातील काही भागाचे वाचनही करणार आहेत.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ मार्च १९९९ रोजी तर दुसरी आवृत्ती अवघ्या एका महिन्यांत म्हणजे ४ एप्रिल १९९९ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर हे पुस्तक न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईच्या कचाटय़ात सापडले होते. न्यायालयाकडून या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. मात्र पाध्ये यांनी न्यायालयीन कचाटय़ातून २००० मध्ये हे पुस्तक सोडवले. त्यामुळे पुस्तकावरील बंदी उठली. नंतर त्याच वर्षी पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. पुढे दर वर्षी एक या प्रमाणे एकेक आवृत्ती येत राहिली. दादांचे आयुष्य हे विविध नाटय़पूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या या सर्व आयुष्याचा पट उलगडला गेला आहे. हे आत्मचरित्र असूनही दादांनी आपल्या आयुष्यात जे काही घडले त्यापैकी काहीही न लपवता सर्व काही प्रश्नंजळपणाने सांगितले आहे. आपल्यातील गुण-दोषांसकट त्यांनी स्वत:ला वाचकांपुढे सादर केले असून त्यांचे हे प्रश्नंजळपण दादांच्या चाहत्यांसकट सर्व वाचक आणि रसिकांना भावल्यामुळेच दहा वर्षात पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत असल्याचे पाध्ये यांनी ‘वृत्तान्त’शी बोलतांना सांगितले.
चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करत असल्यामुळे दादा कोंडके यांच्याशी परिचय होताच. या पुस्तक लेखनाच्या निमित्ताने तो अधिक जास्त जवळून झाला. पुस्तकाचे लेखन करण्यापूर्वी मी जवळपास अकरा महिने दररोज दादांशी बोलून सर्व माहिती घेत होते. दुपारी ४ ते रात्री ९ अशी वेळेत आमच्या गप्पा व्हायच्या. आमचे हे सर्व बोलणे ध्वनिमुद्रीत केलेले असून त्याच्या ८० कॅसेट्स माझ्याकडे आहेत. दादांशी बोलून सर्व माहिती घेऊन झाल्यानंतर तीन महिन्यांत मी पुस्तक लेखनाचे काम केले. पुस्तकाचे लेखन हे दादांच्या शैलीतच केले असल्याचे त्या म्हणाल्या.
हिंदी आणि गुजराथी भाषेत या पुस्तकाच्या भाषांतर/अनुवादासाठी विचारणा करण्यात आली आहे, मात्र त्याबद्दल अद्याप विचार केला नसल्याचे पाध्ये म्हणाल्या.

Tuesday, June 23, 2009

पंढरीची वारी पोहोचली जगभरी

पंढरीची वारी पोहोचली जगभरी!
मुंबई, २२ जून /प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अव्यातपणे सुरु असलेली पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा अनोखा अविष्कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या वारीमध्ये विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळी आणि इंटरनेटसॅव्ही व ‘आयटी’ क्षेत्रातील युवकही सहभागी होत आहेत. दरवर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणारी ही लाखो माणसे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अशाच उत्सुकतेतून आणि आपण घेतलेल्या वारीचा अनुभव लोकांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने छायाचित्रकार शिरीष शेटे यांनी ‘वारी-पाथ टू दि डिवाइन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे पंढरीची वारी आता जगभर पोहोचणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.
‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.

Tuesday, June 16, 2009

तुकोबांच्या अभंगांवरून

तुकोबांच्या अभंगावरून महात्माजींना स्फूरली तीन माकडांची गोष्ट!
शेखर जोशी
मुंबई, १६ जून
महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देत असतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते.
महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,
पापाची वासना नको दावू डोळा
त्याहूनी आंधळा बराच मी
निंदेचे श्रवण नको माझे कानी
बधीर करोनी ठेवी देवा
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याहूनी मुका बराच मी
नको मज कधी परस्त्रीसंगती
जनातून माती उठता भली
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा
तू ऐक गोपाळा आवडीसी
हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते.
एका अंत्ययात्रेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली.
संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे. येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे. या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नाही.

Sunday, June 14, 2009

महापालिका सज्ज

महापालिका सज्ज
शेखर जोशी
मान्सून अद्याप मुंबई आणि परिसरात दाखल झाला नसला तरी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर उद्भवणाऱ्या पूरपरिस्थीतीला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. अतिवृष्टी झाली तर करावयाच्या उपाययोजनांबरोबरच सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जी खबरदारी घेणे आवश्यक असते, त्यासाठीही पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणी असलेल्या बंदिस्त व उघडय़ा गटारांतून आणि नाल्यांतून गाळ बाहेर काढण्यात आला आहे. मिठी, पोयसर, ओशिवरा आदी नद्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. तसेच संरक्षक भिंत बांधणे व अन्य कामे करण्यात आली आहेत. हाजीअली, लव्हग्रोव्ह, इर्ला नाला आदी पातमुखांच्या ठिकाणी पाणी उपसा करणारे अधिक क्षमतेचे उदंचन संच बसविण्यात आले आहेत. रस्त्यावर असलेल्या गटारांची स्वच्छता करण्यासाठी ३५ यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर येथील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या कार्यशाळेत गाळ उपसणारे १२ फायरेक्स, ९ सक्शन, ३ जेटिंग व २ सक्शन कम जेटिंग मशीन्स ठेवण्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी एक फायरेस्क मशीन ‘एन-पूर्व’ व ‘के-पूर्व’ विभागात ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाली तर शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साठते. शहर विभागात पांडुरंग बुधकर मार्ग, ताडदेव, संत गाडगे महाराज चौक-सातरस्ता, करी रोड रेल्वे स्थानक व ना. म. जोशी मार्ग, वरळी नाका, गणपतराव कदम मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, हिंदूमाता चित्रपटगृह, काळाचौकी तसेच पूर्व व पश्चिम उपनगरात अनुक्रमे अंधेरी सब वे, नवरंग चित्रपटगृह, मीलन सब वे, सहार मार्ग चौक, बंदरकर वाडी, अमृतनगर, वैशाली नगर, मोतीलाल नगर, ठाकूर संकुल, प्रताप नगर, कोकण नगर, लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग, गव्हाणपाडा गावठाण, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळचा परिसर, सुमन नगर, स्वस्तिक चेंबर्स, नेहरू नगर आदी ठिकाणी पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच सखल भागात पावसाचे साठलेले पाणी बाहेर उपसून टाकण्यासाठी १९३ ठिकाणी २११ पंप बसविण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने आपत्कालिन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून पालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांशी ११ हॉटलाइन येथे जोडण्यात आलेल्या आहेत. आपत्कालिन प्रसंगी नागरिकांना १०८ व १९१६ या क्रमांकांवर थेट संपर्क साधावा. प्रशासनातर्फे गेल्या काही वर्षापासून हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मदत घेण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दूरध्वनी किंवा मोबाइल सेवा बंद पडली तर हॅम रेडिओच्या मदतीने मदत करणे व संपर्क साधणे शक्य होते. पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग त्याद्वारे जोडण्यात आले आहेत. पालिकेच्या नियंत्रण कक्षात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
पालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील अग्निशमन केंद्रांच्या इमारतींवर तसेच पालिका मुख्यालय व काही विभाग कार्यालयांवर ३५ स्वयंचलित हवामानदर्शक व पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. तेथे पडणाऱ्या पावसाची नोंद २४ तास करण्यात येणार असून आपत्कालिन प्रसंगी कोणत्या विभागात किती पाऊस झाला, कोणत्या विभागात पावसाचा जोर वाढत आहे त्याची माहिती अवघ्या १५ मिनिटात पालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात १५ मिनिटांत २० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
पालिलकेच्या २४ विभाग कार्यालयांतही २० मे २००९ पासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. सर्व विभाग कार्यालयात दोन जेसीबी व एक डंपर आणि २४ तास कर्मचारी वर्ग ठेवण्यात येणार आहे. ज्या विभागात पाणी साठण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप व कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील पाच महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशमन दलही आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले आहे. वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर, मरोळ आणि बोरिवली येथे प्रश्नदेशिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी बोटी, फ्लोटिंग स्टेचर, जीवरक्षक जॅकेट्स, रेस्क्यू टय़ूब्स आणि अन्य साधनसामग्री व पुरेसे कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाने पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी केली असली तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मुंबई व परिसरात कधी एकदा पाऊस सुरू होतोय, त्याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारण पाऊस पडला तर त्याला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. परंतु २६ जुलै २००५ साररखी अतिवृष्टी झाली तर मुंबईत पाणी साठणारच, ते रोखणे शक्य नाही. तरीही अशा आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करून पूरपरिस्थितीला तोंड देईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
महापालिका मुख्य नियंत्रण कक्ष-१०८, १९१६, २२६९४७२५, २२६९४७२७, २२६९४७११ (फॅक्स)
पोलीस नियंत्रण कक्ष-१००, २२६२००८१, २२६२१८५५
अग्निशमन नियंत्रण कक्ष-१०१, २३०८५९९१, २३०८५९९२ ते ९४.
हवामान विभाग-२२१५०४३१
पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष-२२०१७४२०
मध्य रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
कोकण रेल्वे नियंत्रण कक्ष-२७५७९९६९
रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
राज्य पोलीस नियंत्रण कक्ष-२२०२६५६६
एमएमआरडीए नियंत्रण कक्ष-२६५९४१९०
‘बेस्ट’ वाहतूक नियंत्रण कक्ष, वडाळा-२४१४३६११, २४१३६८८३, २४१३७६४५, २४१४६१६२

Thursday, June 11, 2009

मनपा करणार औषधी झाडांची लागवड

महापालिका करणार औषधी झाडांची लागवड
प्रतिनिधी
मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आणि पर्यावरणाला पोषक ठरतील, अशा आयुर्वेदिक झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्याचा निर्धार बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे. पावसाळ्यात एक रुपया इतके नाममात्र शुल्क घेऊन मुंबईकरांना रोपांचे वाटप करण्यात येणार असून यंदा एक लाख रोपांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक व महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
२००९-१० या आर्थिक वर्षासाठी वृक्ष प्रश्नधिकरणासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्था तसेच अन्य ठिकाणी अडुळसा, नागकेशर, कोरफड, तुळस, आवळा, हिडा, बेहडा, आदी औषधी झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाकडून १० कोटी रुपयांची मदत मागण्यात आली आहे, असे आयुक्त म्हणाले.
मुंबईत दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. ती झाडे विशेष करून मोकळ्या जागी लावण्यात यावीत, रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात येऊ नयेत. कारण येथे लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण कमी आहे. झाडे वाढली तरी नंतर ती कापावी लागतात. झाडे आणि पक्षी यांचा परस्पर संबंध असून पालिकेने ‘हरित क्षेत्रा’तील झाडांवर पक्ष्यांसाठी निवारे बांधावेत, अशी सूचना महापौरांनी या वेळी केली.
मुंबईत १९ लाख १७ हजार झाडे अस्तित्वात असून गेल्या पाच वर्षात झाडांच्या संख्येत सात लाखांनी वाढ झाली आहे. मुंबईत दोन लाख ४१ हजार अशोकाची, एक लाख ७४ हजार नारळाची, एक लाख आठ हजार आंब्याची तर एक लाख ५९ हजार सुबाभुळाची झाडे असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी या वेळी दिली.
जाहिरातीचे फलक लावण्यासाठी अनेकदा झाडांची कत्तल केली जाते, अशी कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही महापौरांनी या वेळी केली. महापालिका यंदा पावसाळ्यात रोपांचे वाटप करणार आहे. या रोपांबरोबर पालिकेने नाममात्र शुल्क आकारून खत व मातीही द्यावी, अशी सूचना महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष कुमार पांडे यांनी या वेळी प्रशासनाला केली.

आणखी पाणीकपात

पाऊस लांबल्यास मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात?
प्रतिनिधी
मान्सून अद्यापही मुंबईत दाखल झालेला नसल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आणखी काही दिवस पाऊस मुंबईत दाखल झाला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिकेत पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा शिल्लक असून खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत मान्सून दाखल कधी होतोय त्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. पुढील आठवडय़ातही पाऊस दाखल झाला नाही तर आणखी १० ते १५ टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पाणीकपात १५ ते २५ टक्के होईल. मात्र याबाबत पुढील आठवडय़ातच निर्णय घेण्यात येणार आहे.

‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ पालिकेचे अभियान
प्रतिनिधी
नुकत्याच साजऱ्या झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी ‘वृक्षारोपण आणि पातळ प्लास्टिकपासून सर्व नागरिकांचा बचाव’ या विषयावर जनजागृती मोहिम आयोजित केली होती. ग्लोबल वॉर्मिगचा धोका आणि मुंबईत विविध मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही राजीव यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे, असे राजीव यांनी सांगितले.

Thursday, June 4, 2009

मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण

मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण!
‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ पुस्तकाचे अभिवाचन सुरू
शेखर जोशी
खासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत.
आकाशवाणीच्या मुंबई आणि पुणे केंद्रावरून सध्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे अभिवाचन सुरू झाले आहे. अमेरिकास्थित उद्योजक-व्यावसायिक असलेले डॉ. ठाणेदार यांच्या या पुस्तकाच्या गेल्या तीन-चार वर्षांत वीसहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दर बुधवारी सकाळी ७-४० वाजता त्याचे प्रसारण होत असून २७ भागात या पुस्तकाचे अभिवाचन केले जाणार आहे.
आकाशवाणीच्या मुंबई (ब) केंद्रावरून म्हणजे आत्ताच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरुन गेल्या काही वर्षांपासून मराठीतील निवडक पुस्तकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला व्यावसायिक स्वरुप देण्याचे आणि पुस्तकांचे वाचनमहामालिका स्वरुपात सादर करण्याचे श्रेय आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांना जाते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे २५ पुस्तकांवर अभिवाचनाच्या मालिका सादर केल्या आहेत. यात धनुर्धारी (वाईकर भटजी), डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आणि आम्ही) गोडसे भटजी (माझा प्रवास), मधु मंगेश कर्णिक (लागेबांधे), प्रल्हाद चेंदवणकर (टाच) आणि अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे.
विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील ‘महानायक’ या कादंबरीच्या अभिवाचनाची महामालिका खूप गाजली. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील अनेक नामवंत या अभिवाचनात सहभागी झाले होते. या मालिकेचे २५५ भाग सादर झाले व या मालिकेने आकाशवाणीलाही सुमारे २५ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला होता.
आकाशवाणीवर एखाद्या पुस्तकावरील अभिवाचन सादर झाले की वाचकांमध्ये तसेच साहित्यप्रेमींमध्ये त्या पुस्तकाची चर्चा होऊन सार्वजनिक किंवा खासगी ग्रंथालयातून त्या पुस्तकाला मागणी येते, पुस्तकाची विक्री वाढते, असा अनुभव आहे. मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांसाठीही त्याचा चांगला उपयोग झाला असल्याचे डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले.

स्वाती खंडकर यांचे निधन

स्वाती खंडकर यांचे निधन
मुंबई, ४ जून / प्रतिनिधी
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ या संस्थेच्या कार्यवाह आणि मुक्त पत्रकार स्वाती खंडकर यांचे आज सकाळी विलेपार्ले येथील निवासस्थानी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या या विकाराने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू असा परिवार आहे.परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात त्यांना आठ दिवसांपूर्वीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खंडकर यांनी ‘लोकसत्ता’साठीही काही काळ विलेपार्ले येथे साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलक म्हणून काम केले होते. लोकमान्य सेवा संघाच्या साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. लोकमान्य सेवा संघाच्या कामाशी त्या गेल्या वीस वर्षांपासून निगडित होत्या. लोकमान्य सेवा संघ, टिळक स्मारक मंदिराच्या अनेक साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच अन्य संस्थांसाठीहीबऱ्याच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. महाराष्ट्रात आणि भारतात विविध ठिकाणी मनुष्यबळ विकास आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रशिक्षण आणि व्याख्याने देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येत होते.

Wednesday, June 3, 2009

महामंडळाच्या कार्यक्रमाला अद्याप मुहूर्त नाही

साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला अद्याप मुहूर्त नाही!
प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमाला यंदा मे महिना संपत आला तरीही अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असतो. तसेच वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर घेण्याचा संकेत आहे. मात्र राज्याबाहेरील कोणी संस्था कार्यक्रम घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. महाबळेश्वर येथे झालेले वादग्रस्त ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांची भूमिका यामुळे हा वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय हे महाराष्ट्रात असल्याने महामंडळाच्या राज्याबाहेर असलेल्या शाखांनी किंवा संलग्न संस्थांनी महामंडळाच्या वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आयोजित करावा, असा संकेत आहे. यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम गोवा किंवा गुजराथ राज्यातील संस्थानी आयोजित करावा, असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे समजते. राज्याबाहेरील संस्थानी हा कार्यक्रम आयोजित केला नाही, तर महामंडळाला आता हा का र्यक्रम महामंडळाला राज्यातच घ्यावा लागेल, असे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्यामुळे महामंडळाचा वर्धापन दिन कार्यक्रम होऊ शकला नाही. हा कार्यक्रम राज्याबाहेर घेण्याचा संकेत असला तरी तो दरवर्षी बाहेरच झाला पाहिजे, असा काही नियम नाही. या वेळी वर्धापन दिन कार्यक्रम राज्याबाहेर न होता आम्ही तो लवकरच पुण्यात आयोजित करत आहोत.
या संदर्भात घेण्यात येणाऱ्या आक्षेपात काहीही तथ्य नसल्याचा दावा करून यंदाचा वर्धापन दिन कार्यक्रम राज्याबाहेर न होता आम्ही तो लवकरच पुण्यात आयोजित करत असल्याचेही ठाले-पाटील यांनी सांगितले.

मिकी व डोनाल्डच्या नव्या गोष्टीi

मिकी आणि डोनाल्डच्या नव्या गोष्टी पुस्तकस्वरुपात
प्रतिनिधी
सर्व वयोगटातील लहान मुलांना वेड लावणारी मिकी माऊस आणि डोनाल्ड डक ही पात्रे आता दर महिन्याला पुस्तकरुपाने भेटायला येणार आहेत. दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात मिकी माऊस व डोनाल्ड डकच्या नव्या गोष्टींचा समावेश असणार आहेत. विशेष म्हणजे ही पुस्तके इंग्रजीसह हिंदीतही उपलब्ध होणार आहेत. मिकी माऊस व डोनाल्ड डकच्या या गोष्टी भारतात पहिल्यांदाच उपलब्ध होणार असून वॉल्ट डिस्ने कंपनीच्या डिस्ने पब्लिशिंग वर्ल्ड वाईड या विभागातर्फे अलीकडेच ही घोषणा करण्यात आली. या संदर्भात वॉल्ट डिस्ने कंपनीच्या डिस्ने पब्लिशिंग वर्ल्ड वाईड या विभागाने भारतातील ज्युनिअर डायमंड या प्रकाशन संस्थेबरोबर करार केला आहे. मिकी माऊस आणि डोनाल्डच्या गोष्टी लहानांबरोबरच मोठय़ांमध्येही लोकप्रिय असून भारतात मिकी माऊस व डोनाल्ड डकची पुस्तके प्रकाशित करताना येथील सामाजिक जीवन व भारतातील एकंदर वातावरण या गोष्टी सुसंगत राहतील याची खबरदारी घेण्यात येईल, असे डिस्ने कंझ्युमर प्रॉडक्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या पुस्तकांची किंमत २५ रुपये इतकी ठेवण्यात आली असून मिकी आणि डोनाल्डच्या नव्या गोष्टी दर महिन्याला पुस्तक स्वरुपात प्रकाशित होणार आहेत.

पुस्तक प्रकाशक-विक्रेत्यांची बैठक बारगळली

साहित्य महामंडळाच्या विरोधातील प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांची बैठक बारगळली
प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महामंडळाच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिलेल्या काही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी एप्रिल महिन्यात बैठक घेण्याचे ठरवले होते. मात्र एक महिना उलटून गेला तरी अद्याप अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. तर महामंडळावर प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांना प्रतिनिधीत्व देता येणार नाही, घटनेत तशी तरतूद नाही, असे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पुस्तक प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांसाठी स्टॉल्स मांडण्यात येतात. मात्र त्या ठिकाणी अनेक गैरसोयी असतात, स्टॉल्सची रचना योग्य प्रकारे नसते, व्यवस्थेत काही त्रुटी असतात, असे आक्षेप प्रकाशक सुनील मेहता, ‘अक्षरधारा’या पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या संस्थेचे रमेश राठीवडेकर यांच्याकडून महाबळेश्वर येथे घेण्यात आले होते.
तसेच साहित्य महामंडळावर प्रकाशक आणि विक्रेते यांच्या दोन प्रतिनिधींना घेण्यात यावे, अशी मागणीही मेहता व राठीवडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली होती. यासाठी आपण लवकरच महामंडळाला निवेदन सादर करणार असून महामंडळाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी एप्रिल महिन्यात पुण्यात सर्व प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांची बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मेहता यांनी जाहीर केले होते.

मात्र एप्रिल महिना गेला आणि आता मे महिनाही संपत आला तरी अशी बैठक झालेली नाही. त्यामुळे ही बैठक का बारगळली आणि ती आता कधी होणार त्याकडे प्रकाशक आणि विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या संदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, प्रकाशक किंवा ग्रंथविक्रेत्यांकडून महामंडळाला कोणतेही निवेदन अद्याप प्राप्त झालेले नाही. महामंडळावर प्रकाशक किंवा ग्रंथविक्रेत्यांना प्रतिनिधीत्व देण्याची कोणतीही तरतूद घटनेत नाही. असे पत्र आले तर त्यावर महामंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. प्रकाशक किंवा ग्रंथविक्रेत्यांना महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत, त्यांच्यामार्फत महामंडळावर प्रतिनिधीत्व मिळू शकते.
तर सुनील मेहता व रमेश राठिवडेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मसापचे संकेतस्थळ

इंटरनेटच्या महाजालात आता महाराष्ट्र साहित्य परिषद!
प्रतिनिधी
मराठी भाषा आणि साहित्य प्रसारासाठी गेली १०० हून अधिक वर्षे काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेही आता इंटरनेटच्या महाजालात प्रवेश केला आहे. ‘मसाप’ने नुकतेच आपले स्वत:चे \www.masapaonline.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे मसापचे विविध उपक्रम, कार्यक्रम आणि त्यांचे काम एका क्लिकवर उपलब्ध झाले आहेत.
मसापची स्थापना २७ मे १९०६ रोजी पुण्यात चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. मराठी भाषा व साहित्य यांची जपणूक, विकास आणि प्रसारासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. हेच ग्रंथकार संमेलन पुढे काही वर्षांनी मराठी साहित्य संमेलन म्हणून आयोजित करण्यात येऊ लागले. ‘मसाप’च्या या संकेतस्थळावर इतिहास, कार्यकारी मंडळ, कार्यक्रम, सदस्यत्व, पुरस्कार, स्पर्धा, उपक्रम, शाखा, कार्यालयीन व्यवस्था आणि निवेदने असे विभाग करण्यात आले आहेत. इतिहास या विभागात ‘मसाप’च्या स्थापनेचा सविस्तर इतिहास देण्यात आला आहे.
‘मसाप’तर्फे देण्यात येणारे विविध ग्रंथ पुरस्कार, ग्रंथकार पुरस्कार, ‘मसाप’चे नाटय़कार्यशाळा, एकांकिका लेखन, कथालेखन, काव्यवाचन स्पर्धा, बाल वाचनालय, कॉफीक्लब साहित्यिक गप्पा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र, वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय, ‘मसाप’च्या विविध शाखांचे पत्ते आणि अन्य उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.
संकेतस्थळावर सुरुवातीलाच तुकाराम महाराज यांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांची शस्त्रे यत्न करू’ अशा ओळी देण्यात आल्या आहेत. तर त्याखाली मराठी साहित्यातील अक्षरलेणी म्हणता येतील, अशा काही मान्यवरांची वचने, ओळी उधृत करण्यात आल्या आहेत. यात संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानातील ‘दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’, समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे’, सुरेश भट यांच्या ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ आदींचा समावेश आहे.
हे संकेतस्थळ सुरू केल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद व संस्थेचे काम आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांनाही ‘मसाप’चे काम कळण्यास मदत होणार आहे.

Thursday, May 28, 2009

वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा

मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकावरून आणि या स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती केल्याच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने जेव्हा असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही विविध स्तरातून त्याविषयी तीव्र नाराजी प्रकट झाली होती. आता तर मराठा अभिमानाने पछाडलेल्या काही तथाकथीत नेत्यांनी स्मारकाच्या समिती अध्यक्षपदावरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे, त्यांनी शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण केले, शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी उगाच मोठे केले, असे अकलेचे तारे तोडत बाबासाहेबांचा अपमान केला आहे. पुरंदरे यांच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वावर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक करणाऱया या नेत्यांना त्यांच्या समाजानेच जागा दाखवून दिली पाहिजे. हा वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा आहे, हे बेताल बडबड करणाऱया नेत्यांनी आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही स्पष्ट करावे.

शिवाजी महाराज यांचे चरित्र पाहिले तर असे दिसते की शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या बरोबर प्राणांची बाजी लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात मराठ्यांबरोबरच ब्राह्मण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशा उच्च जातींबरोबरच सर्व जातीतील लोक सहभागी झाले होते. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातही ब्राह्मण मंडळी होती. शिवाजी महाराज यांनी आजच्या भ्रष्ट आणि नालायक राज्यकर्त्यांसारखे केवळ जात पाहून किंवा केवळ आपली हुजरेगिरी करणाऱया मंडळींना पदे दिलेली नव्हती. तर प्रत्येक व्यक्तीची योग्य ती पारख करून, त्याचे कर्तृत्व आणि बुद्धीमत्ता पाहूनच त्यांना पदे, व जबाबदाऱया दिल्या होत्या. या देशाशी व राजाशी निष्ठा असलेले मुसलमान मावळे व सरदारही महाराजांच्या पदरी होते. शिवाजी महाराज यांनी प्रसंगी आपल्या सग्यासोयऱयांचीही गय न करता, त्यांना दयामाया न दाखवता, त्यांच्या अपराधाला कठोर शासन केले असल्याचे दाखले इतिहासात आहेत. असे असतानाही हा सर्व इतिहास विसरुन केवळ जातीपातीचे राजकारण करून मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी करण्यात येणारे हे राजकारण पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बशिंग बांधून बसलेल्यांच्या अंगाशी येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आली नाही. खरे तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अशी वक्तव्ये केल्याप्रकरणी या साहेबांनी बेताल वक्तव्य करणाऱया नेत्यांचे कान धरायला हवे होते, पण त्यांनी तोंडातून एक चकार शब्द काढलेला नाही. कॉंग्रेसचे नेते, मुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांचे नेतेही तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. एकट्या राज ठाकरे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सर्वसामान्य शिवप्रेमी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांच्या मनात जी भावना होती, त्यालाच राज ठाकरे यांनी मोकळी वाट करून दिली आहे.


गेली अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे हे निष्ठेने आणि एखादे व्रत घेतल्याप्रमाणे शिवचरित्राचे कथन संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत शिवचरित्र पोहोचविण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. आजवर शिवचरित्रावर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जाणता राजा सारखे भव्य महानाट्य सादर केले आहे. पुरंदरे यांच्या शिवप्रेमाविषयी, त्यांच्या निष्ठेविषयी कोणालाही शंकाही घेता येणार नाही, असे त्यांचे कार्य आहे. मात्र असे असताना तथाकथीत काही नेते जातीच्या नावावर पुरंदरे यांच्या नावाला विरोध करतात, हे आपले दुर्दैव म्हणयाचे. पुरंदरे यांनी कधीही पेशवाई व ब्राह्मण गौरवाचा उदोउदो केलेला नाही. ते पेशवाईवर व्याख्याने देत नाहीत. तसेच शिवचरित्राचा इतिहास जुन्या बखरी, कागदपत्रे यांचाच आधार घेऊन सांगतात. आपल्या मनाचे ते काही घुसडत नाहीत. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट व अन्य प्रसंग हे ही एेतिहासिक कागदपत्रे, नोंदी व पुराव्यांच्या आधारे बोलत असतात. त्यांचे म्हणणे कोणाला पटत नसेल तर त्यांनी ते चर्चा करून खोडून काढावे, ते खोटे आहे, असे म्हणणाऱी काददपत्रे सादर करावीत. पण हे काहीही न करता केवळ पुरंदरे हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. आता जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा भंपक व जातीच्या नावावर राजकारण करणाऱया या तथाकथीत नेत्यांना भर चौकात चाबकाने फोडले असते किंवा त्यांच्या वळवळणाऱया जीभा छाटून टाकल्या असत्या.


सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून समुद्रात हे स्मारक उभारण्याची खरोखरच गरज आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. महाराजांचे जीवंत स्मारक असलेले अनेक गड व किल्ले आज दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. अनेक गडांची पडझड होत आहे, त्यामुळे खरे तर या पैशातून सर्व गडांची देखभाल व दुरुस्ती करता येऊ शकेल. प्रत्येक गड व किल्ल्यावर त्या गडाचा इतिहास, लाईट अॅण्ड साऊंड सारखे शो, छायाचित्रे किंवा गडावर घडलेल्या प्रसंगांची चित्रे यांचे भव्य प्रदर्शन, गडावर घडलेले प्रसंग दर्शवणारी म्युरल्स/ पुतळे करता येतील, गडावर जाण्यासाठी चांगला रस्ता, गडावर विविध ठिकाणी त्या त्या वास्तूची ओळख सांगणारे फलक लावणे आदी कामेही करता येऊ शकतील. किंवा या पैशातून महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, प्राथमिक शाळा, दवाखाने, आरोग्यकेंद्रे सुरु करता येतील. पण हे सगळे करण्याची मनापासून आच व इच्छा हवी. प्रखर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते. पुरंदरे यांना घेण्यावरून जर असा नाहक वाद उत्पन्न होत असेल तर राज्य शासनाने स्मारकाचा हा प्रकल्पच रद्द करून टाकावा. पुरंदरे यांच्या विरोधात बोलणाऱयांना सुतासारखे सरळ करावे. अन्यथा पुन्हा जातीच्या राजकारणावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष आणि वाद उभा राहील...

ध्यासपंथ

ध्यासपंथ’ म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची गाथा - मनोहर जोशी
प्रतिनिधी
दिनेश गुणे लिखित ‘ध्यासपंथ’ हे पुस्तक म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थाच्या कामाची गाथा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मंगळवारी प्रभादेवी येथे केले.
परममित्र पब्लिकेशन्सतर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जोशी आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते ‘ध्यासपंथ’ यासह संतोष शिंत्रे (अरण्यरुदन), शैलेश माळोदे (अतिसूक्ष्म, महाप्रचंड), ज्ञानेश्वर भोसले (१४ महिने, १३ दिवस आणि) यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. याच वेळी परममित्र पुरस्कारांचेही वितरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक माणूस हा स्वत:पुरता जगतो, तर काही जण कुटुंबासाठी जगतात, मात्र समाजात अशीही काही मंडळी असतात की ती समाजासाठी जगत असतात. गुणे यांच्या या पुस्तकात समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱ्या माणसांचे चित्रण करण्यात आले आहे, असेही जोशी यांनी या वेळी सांगितले.
जो संवेदनाक्षम माणूस आहे, तोच सामाजिक कामाचा पंथ अनुसरू शकेल, या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने किमान एका तरी सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले. डॉ. फोंडके या वेळी बोलताना म्हणाले की, आज प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वस्तूनिष्ठ निरीक्षण, चिकित्सक विश्लेषण आणि संख्याशास्त्रीय विवेचन दिसून येते. आज आपल्या जीवनशैलीवर विज्ञान-तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असून कोणत्याही तंत्रज्ञानाचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. तो कसा करुन घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी विज्ञान समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वामध्ये विज्ञानविषयक जाणीव निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांचे लेखक माळोदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘नॅनो’ टेक्नॉलॉजी हा विषय युवकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. शिंत्रे यांनी सांगितले की, या पुस्तकामुळे आपल्या सर्वाना निसर्ग व पर्यावरण व त्याच्याशी निगडीत प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी मिळावी. या वेळी बोलताना गुणे म्हणाले की, विशिष्ट ध्येयाने आणि ध्यासाने समाजासाठी स्वार्थरहित काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय या पुस्तकात मी करून दिला आहे. तर भोसले यांनी आपण फासेपारधी कुटुंबात जन्म घेतला असून आपल्या समाजासाठी आपण काय केले, त्याची माहिती दिली. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी या चारही पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. ‘ध्यासपंथ’ पुस्तकातील गिरीश प्रभुणे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर वालावलकर, संजय कांबळे, विजय जाधव यांचा या वेळी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल श्रुतिका शितोळे (मराठी), शकुंतला गावडे (संस्कृत), दिव्या रेवणकर (गणित), गिरिका भटेजा (तत्वज्ञान), अकबर पिंजारी (भौतिकशास्त्र) यांना जोशी यांच्या हस्ते परम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनातर्फे घेण्यात आलेल्या गंगाधर गाडगीळ राज्यस्तरीय कथा स्पर्धेतील भरत गोडांबे व सीमा शिरोडकर या प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला. संजय कांबळे यांना समाजविकास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर अनुपमा उजगरे यांनी सूत्रसंचालन केले. परमविकास केंद्राच्या विश्वस्त संगीता पवार यांनी परममित्रच्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.

Friday, May 8, 2009

सुरु आहे दुर्मिळ पोथ्यांचे स्कॅनिंग

बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ‘पोथीशाळेत’ सुरू आहे दुर्मिळ पोथ्यांचे स्कॅनिंग!
प्रतिनिधी
महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध भागात अनेक जुनी व दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्या असून काळाच्या ओघात हा अनमोल ठेवा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व अन्य काही संस्था हे काम करत असून त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाची भर पडली आहे. या विभागात असलेल्या पाच हजार दुर्मिळ हस्तलिखित पोथ्यांचे स्कॅनिंग करण्यात येत असून त्याच्या सीडी तयार करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे दोन लाख पाने स्कॅन करण्यात आली आहेत.
विदयापीठाच्या मराठी विभागात सुमारे पाच हजार हस्तलिखिते असून ती दुर्मिळ आहेत. अभ्यासक, संशोधक किंवा सर्वसामान्यांना ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि हा ठेवा नष्ट न होता, तो कायम स्वरुपी टिकून राहण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. येत्या एक ते दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल,अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे. या अनमोल ठेव्यामध्ये महानुभाव, दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि अन्य काही पोथ्यांचा समावेश आहे. महानुभाव पंथांच्या पोथ्या सांकेतिक लिपीत आहेत. डॉ. अशोक देशमाने व प्रा. सतीश बडवे हे काम पाहात आहेत. मराठी विभागात या पोथ्या जमा करण्याचे काम माजी विभागप्रमुख डॉ. यु. म. पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. डॉ. पठाण यांच्याही मार्गदर्शनाखाली काही काळ हे काम करण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आर्थिक मदतीतून हे काम करण्यात येत आहे. सर्व पोथ्यांचे स्कॅनिंग करून झाल्यानंतर सर्व पोथ्यांची यादी सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. दत्ता भगत यांनी स्कॅनिंगसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.

Thursday, May 7, 2009

तुकारामांचे चरित्र आता राजस्थानीतही

तुकारामांचे चरित्र राजस्थानीतही!
मुंबई, ७ मे / प्रतिनिधी
जगभर लोकप्रिय असलेल्या www.tukram.com या संकेतस्थळावर आता राजस्थानी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र राजस्थानी भाषेत अनुवादित करून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या या संकेतस्थळावर मराठीसह १० प्रादेशिक व चार परदेशी भाषांमध्ये तुकारामांचे चरित्र, लेख आणि अभंग उपलब्ध आहेत.
‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या राजस्थानी विभागात डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी तुकाराम चरित्राचा राजस्थानी भाषेत केलेला अनुवाद वाचायला मिळतो. तसेच काही निवडक अभंगांचे निरुपणही त्यांनी केलेले आहे. स्वामी यांनी यापूर्वी शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचा राजस्थानी भाषेत अनुवाद केलेला आहे.
१७ फेब्रुवारी २००२ मध्ये हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. दिलीप धोंडे या संकेतस्थळाचे समन्वयक असून डॉ. सदानंद मोरे व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र बऱ्हाटे, गिरीश गांधी, देवेन राक्षे, सतीश पंडिलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. मराठीतील संकेतस्थळावर लेख, छायाचित्रे, अभंग, चरित्र आदी विविध विभाग आहेत. या संकेतस्थळावर देहू येथील श्री तुकाराम महाराज संस्थानच्या सौजन्याने तुकाराम गाथेची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ परदेशातही लोकप्रिय असून गेल्या सात वर्षांत जगभरातीलही लाखो नेटकऱ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.

Monday, May 4, 2009

मराठी वाङ्मयाचा इतिहास

महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार मराठी वाङ्मयाचा इतिहास सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम पूर्ण
प्रतिनिधी
स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांतील मराठी वाङ्यमयाच्या इतिहासाचा आढावा घेणारा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार आहे. या ग्रंथात १९५० ते २००० या कालखंडातील साहित्याचा समग्र आढावा घेण्यात येणार असून या महिन्यातच पुस्तकाच्या या पहिल्या भागाचे प्रकाशन होणार आहे. ‘मसाप’तर्फे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा घेणारे खंड प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम आता पूर्ण झाले आहे. या सातव्या खंडाचे तीन भाग करण्यात आले असून त्यात सुमारे चाळीस विषय हाताळण्यात आले आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या संपादनाखाली सातवा खंड तयार होत आहे. ‘मसाप’चे वि. भा. देशपांडे हे कार्यकारी संपादक आहेत.
या खंडात मराठी चरित्र वाङ्मय, प्रवासवर्णन, विज्ञान, स्त्रीवादी, बाल साहित्य, संगीत, शिल्प व चित्रकला यासह अन्य विषयांचा या खंडात समग्र आढावा घेण्यात येणार आहे. डॉ. वसंत आबाजी डहाके, निरंजन घाटे, डॉ. अश्विनी धोंगडे आणि अन्य मान्यवर व तज्ज्ञ मंडळींचे लेख या खंडामध्ये आहेत. ‘मसाप’चा १०३ वा वर्धापन दिन येत्या २७ मे रोजी असून त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात सातव्या खंडाचा पहिला भाग प्रकाशित करण्यात येणार आहे.

प्राणीसंग्रहालय बंद करण्याची मागणी

भायखळा येथील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची प्राणी संघटनांची मागणी
प्रतिनिधी
भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेण्याबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, अशी मागणी विविध प्राणीमित्र संघटनांनी केली आहे. या संदर्भात पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) या संघटनेने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. या प्राणीसंग्रहालयातील एका पाणघोडय़ाचा नुकताच मृत्यू झाला होता.
त्या पाश्र्वभूमीवर ‘पेटा’ने ही मागणी केली आहे. अनेक प्राणीमित्र संघटनांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसून त्यांना पाहिजे त्या प्रमाणात नैसर्गिक वातावरण मिळत नाही. पक्ष्यांना मुक्तपणे उडता येत नसल्याची तेथे परिस्थिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून या प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नाही, त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, असे प्राणीमित्र संघटनांचे म्हणणे आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र प्राणीमित्र संघटनांकडून घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. येथील कर्मचारी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची तसेच प्राणीसंग्रहालयाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.

भावगीतांचा सुवर्णकाळ

आजपासून दर मंगळवारी ‘भावगीतांचा सुवर्णकाळ’!
मुंबई, ४ मे / प्रतिनिधी
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या, ५ मे पासून दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ‘भावगीतांचा सुवर्णकाळ’ ही मालिका प्रसारित होणार आहे. भावगीतांच्या सुरेल आठवणी, किस्से, संदर्भ, जुनी भावगीते असे या मालिकेचे स्वरूप आहे.

कोकणातील सर्व ग्रंथालये आता एका क्लिकवर

कोकणातील सर्व ग्रंथालये आणि पुस्तकांची माहिती एका क्लिकवर!
प्रतिनिधी
ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या एका संकेतस्थळामुळे कोकणातील सर्व ग्रंथालये आणि या ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके केवळ एका क्लिकद्वारे जगभरातील साहित्यप्रेमी आणि वाचकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या ठाणे
जिल्ह्यातील पाच ग्रंथालयांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.granthalaya.org असे या संकेतस्थळाचे नाव आहे. कोकणात विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथालयांमध्ये अनेक दुर्मिळ आणि मौलिक ग्रंथसंपदा असून जगभरातील वाचक आणि अभ्यासकांना या संकेतस्थळामुळे त्यांची माहिती मिळणार आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. विजय बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून जोशी-बेडेकर महाविद्यालयातील ग्रंथपाल नारायण बारसे, संतोष भावसार व कौस्तुभ काळे यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मराठी ग्रंथसंग्रहालय, नगर वाचन मंदिर, जव्हार वाचनालय, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय व सार्वजनिक ग्रंथालय-कल्याण अशी पाच ग्रंथालये सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोकण विभागातील सर्व ग्रंथालये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके यांची माहिती लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. पुढील वर्षी हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या संकेतस्थळावर सुमारे २५ लाख पुस्तकांची यादी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे अभ्यासक, साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी ही मोठी सोय होणार आहे.

Sunday, May 3, 2009

वक्ता दशसहस्त्रेषु

वक्ता दशसहस्त्रेषु’
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मुंबईतील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रालाही जबरदस्त धक्का बसला आहे. शेवाळकर यांच्या जाण्याने ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हरपला आहेच, पण त्याच बरोबर महाराष्ट्र साहित्य, संस्कृती, संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकाला मुकला असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, वाचकांबरोबरच राजकारण आणि अन्य क्षेत्रातील लोकांनीही शेवाळकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अरुण साधू (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)- शेवाळकर यांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. ते उत्कृष्ट वक्ते, भारतीय व मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. ते मला आपला धाकटा भाऊ मानत असत. अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि खास वऱ्हाडी शैलीतील आदरातिथ्य ही त्यांची वैशिष्टय़े होती.
विद्याधर निमकर (चतुरंग प्रतिष्ठान)- आमच्या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचे ते आधारवड होते. संस्था कशी चालवायची आणि ती चालवतांना माणसांना कसे जोडून ठेवायचे, याचा ते एक आदर्श वस्तूपाठ होते. आम्ही वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असू. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रावर त्यांचा एक आदरयुक्त व प्रेमळ असा दरारा होता. कोणत्याही घटनेतून चांगला अर्थ कसा काढायचा, हे त्यांनीच आम्हाला शिकवले.
डॉ. अरुण टिकेकर (ज्येष्ठ पत्रकार व एशियाटीक सोसायटीचे अध्यक्ष)-शेवाळकर अमोघ वक्तृत्वाची निसर्गदत्त देणगी लाभलेले, संत वाङ्मयाचे भाष्यकार, समाजात टोकाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये सामंजस्य साधू पाहणारे समन्वयक, ऋजू व्यक्तीमत्वाचे पण चुकणाऱ्याला प्रसंगी चार शब्द सुनावण्याचे सामथ्र्य असलेले आणि साहित्य व संस्कृतीचे व्यासंगी आज आपल्यातून निघून गेले आहेत. हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मोठे नुकसान आहेच, पण त्याचबरोबर समाजाचेही अपरिमित नुकसान आहे.
प्रा. डॉ. सुभाष भेंडे (ज्येष्ठ साहित्यिक)- शेवाळकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. रसाळ वाणीचा आणि श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवणारा वक्ता म्हणून त्यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत ख्याती होती. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने सारे जण मंत्रमुग्ध होऊन जायचे.
नागपूरातील त्यांचे निवासस्थान हे विदर्भातील एक सांस्कृतिक केंद्र होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य व संस्कृतीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे.
प्रा. के. ज. पुरोहित (जेष्ठ साहित्यिक)- मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांचे वाचन अखंड होते. संस्था कशी वाढवावी आणि माणसे कशी जोडावीत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या निधनाने आपण सांस्कृतिक क्षेत्राचा फार मोठा आधार गमावला आहे.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय ऊर्जामंत्री)- शेवाळकर हे विचारवंत आणि बुद्धीवंत होते. मराठी साहित्य व भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने युवकांना प्रेरणा मिळायची तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे वकृत्व विचार करायला लावायचे.
नितीन गडकरी (भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)- शेवाळकर आणि आमचे कौटुंबीक संबंध होते. ते विदर्भाचा अभिमान आणि ‘महाराष्ट्र भूषण’ होते. मराठीवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. सोप्या व सर्वाना सहज समजेल, अशा भाषेत ते लेखन करत असत.
माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस-आयचे प्रदेशाध्यक्ष)- युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व संस्कृतीची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही.
अशोक चव्हाण (मुख्यमंत्री)- ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मराठी साहित्यातील तेजस्वी तारा निखळला आहे. लाखो रसिकांवर त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी पडली होती. ज्ञानेश्वरी, रामायण आणि महाभारताच्या निरुपणाला त्यांनी आपल्या प्रतिभेने वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते.
छगन भुजबळ (उपमुख्यमंत्री)- मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला आहे. मराठी साहित्य व संस्कृती क्षेत्रातील त्यांचा वावर हा अनेकांना आधार देणारा होता. त्यांच्या मतांचा सर्वत्र आदर केला जात असे.
मनोहर जोशी (शिवसेना नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष)- शेवाळकर यांच्या निधनाने मराठी शारदेचा सच्चा उपासक आपल्यातून निघून गेला आहे. एक चतुरस्र साहित्यिक म्हणून ते कायमच मराठी वाचकांच्या स्मरणात राहतील. ते माझे वैयक्तिक मित्र असल्याने माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला ते उपस्थित राहात.
आर. आर. पाटील (माजी उपमुख्यमंत्री)- सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि व्यक्तींचे ते आधारस्तंभ होते. उत्तम संघटक, उत्तम लेखक आणि अनुपमवाणी वैभवाचे धनी असेलेले शेवाळकर आज आपल्यात नाहीत.
विलासराव देशमुख (माजी मुख्यमंत्री)- कविता, आत्मकथन, ललित लेखनासह सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी आपला स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांना अमोघ वाणीचे वरदान मिळाले होते. त्यांचा नम्र व आगत्यशील स्वभाव आणि वऱ्हाडी आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी तत्ववेत्ता व विचारवंत आणि उत्तम वक्ता गमावला आहे

Friday, May 1, 2009

संमेलनातील घडामोडींवर पोलिसांचा अहवाल

महाबळेश्वर संमेलनातील घडामोडींवर पोलिसांचा अहवाल
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
वाद-विवादांसह नवनवे विक्रम घडवून महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या साहित्य संमेलनात आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडींचा समग्र अहवाल पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संमेलनात ज्यांचा सहभाग होता, अशा व्यक्तींचीही चौकशी केली गेली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. साहित्य संमेलनाबाबत पोलिसांनी अहवाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि गृहमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.

साहित्यिकानीही केले मतदान

मतदान हा हक्क आणि कर्तव्यसुद्धा
साहित्यिकांनींही केले मतदान
मुंबई, ३० एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या महाराष्ट्रातील तिसऱ्या व शेवटच्या टप्यात बृहन्मुंबईसह ठाणे परिसरात मतदान झाले. आजच्या मतदानात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध साहित्यिकानीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य असल्यानेच आपण दरवेळी न चुकता मतदान करतो, असे साहित्यिकांकडून सांगण्यात आले.
मी आणि माझे कुटुंबीय महापालिकेसह, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी दरवेळी मतदान करतो. आजही आम्ही मतदान केले. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे, मी जेथे राहतो ते ‘साहित्य सहवास’ वांद्रे (पश्चिम) येथे असून हा भाग उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात येतो. एमआयजी क्लबजवळील नवजीवन शाळेत आमचे मतदान केंद्र होते. मी सकाळी अकराच्या सुमारास मतदानाला गेलो होतो. त्यावेळेस संमिश्र प्रतिसाद दिसून आल्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांनी सांगितले.
साहित्य सहवासाच्या एकूण नऊ इमारती असून तेथे ८२ फ्लॅट्स आहेत. आमच्या येथील सर्वचजण दरवेळी न चुकता मतदान करतात. आमच्या मतदार संघात किंवा आम्ही राहतो त्या परिसरात मिठी नदी आणि त्याच्या सभोवतालची बेकायदा बांधकामे, कलानगर येथील जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ आदी काही प्रमुख प्रश्न आहेत. आमच्या येथून जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल, त्याने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असेही भेंडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, माझे वय आता नवव्द असून प्रकृतीअस्वाथ्यामुळे मी हल्ली मतदान करत नाही. त्यामुळे मला या विषयावर अधिक काही बोलता येणार नाही.
राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक म्हणाल्या की, मी आणि माझ्या पतींनी दक्षिण मुंबईत वनिता विश्राम शाळा येतील मतदान केंद्रात मतदान केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास मतदानाला गेलो असता त्यावेळेस गुजराथी भाषिक जास्त संख्येने मतदानाला आलेले दिसले. दक्षिण मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास, बंद होणाऱ्या गिरण्या व त्यातील कामगार, वाहतूक कोंडी आदी प्रश्न महत्वाचे असून निवडून आलेल्या भावी खासदाराने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भावी खासदाराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असावी. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्याने सक्रिय असावे, असे वाटते. तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगाकर यांनी सांगितले की, मी प्रत्येक निवडणुकीला न चुकता मतदान करतो. आजही ककाळी मी मतदान करून आलो. मी शीव येथे राहतो. दक्षिण मध्य मुंबई हा आमचा लोकसभा मतदार संघ असून माझ्या घराजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रात मी मतदान केले. कोण निवडून येईल, ते सांगता येणार नाही.

Tuesday, April 28, 2009

मराठी साहित्याच्या इंग्रजी अनुवादाला

‘मराठी साहित्याच्या इंग्रजी अनुवादाला अमेरिकेत चांगला वाव’
प्रतिनिधी
मराठीतील दर्जेदार आणि चांगली पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली तर या साहित्याला अमेरिकेमध्ये चांगला वाव मिळेल. त्यासाठी मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन असा प्रयत्न अधिक जोमाने करायला पाहिजे, असे मत मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
पुस्तक महोत्सवात तेथील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांच्याशी चर्चा करताना त्यांनीही मराठी साहित्य, प्रकाशित होणारी पुस्तके याबद्दल उत्सुकतेने विचारणा केली. त्यातूनच असे लक्षात आले की, मराठीतील काही निवडक आणि दर्जेदार साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित झाले तर त्याला तिकडे चांगला प्रतिसाद मिळू शकेल. मात्र त्यासाठी जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन या कामासाठी एखादी कंपनी स्थापन करावी आणि मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे काम हाती घ्यावे. मराठीतील काही निवडक पुस्तकांचा सारांश इंग्रजीमध्ये अनुवादित करून आपल्याकडे पाठवावा, अशी अपेक्षाही लंडन महोत्सवात काही जणांनी व्यक्त केल्याचे मेहता यांनी सांगितले.
इंग्रजीमधील प्रसिद्ध लेखक जेम्स पॅटर्सन यांचे एक पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केले असून त्याची एक प्रत आपण लंडन महोत्सवात त्यांना भेट दिली. पुस्तक पाहून ते अतिशय खुष झाले. भारतीय प्रादेशिक भाषेत आपले पुस्तक अनुवादित झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगून मेहता पुढे म्हणाले की, जेम्स यांना भारतीय व महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दल पूर्ण माहिती असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.
लंडनमधील नागरिकांना वाचनाची प्रचंड आवड असल्याचे मला दिसून आले. तेथे रेल्वे किंवा बसच्या प्रवासात जवळपास प्रत्येक प्रवाशाच्या हातात पुस्तक किंवा वर्तमानपत्र असतेच. तसेच तेथील पुस्तकांची दुकाने अतिशय मोठी असतात. ऑक्सफर्ड स्ट्रीटवर फॉईल्स व बॉर्डर या दोन दुकानांना मी भेट दिली. सुमारे एक लाख चौरस फूट जागेत आणि पाच मजल्यांच्या भव्य इमारतीत ही दुकाने होती. लंडन येथील पुस्तकांची दुकाने आणि गोदामात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. लंडनमधीलच गार्डनर्स बुक हाऊस येथे तर दररोज लाखो पुस्तकांची आवक-जावक होते. येथे पुस्तके देण्यासाठी यंत्रमानव असून तुम्ही संगणकावरून पुस्तकांची मागणी केली की यंत्रमानव काही मिनिटात ते पुस्तक आपल्या समोरील ट्रेमध्ये आणून ठेवतो, अशी माहितीही मेहता यांनी दिली.
जर्मन किंवा अरेबिक भाषेतील काही पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करायची असतील तर त्यासाठी त्यांच्याकडून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

Saturday, April 25, 2009

निवडक मराठी साहित्यिक इंटरनेटच्या महाजालात

मराठीतील निवडक साहित्यिक ‘इंटरनेटनेट’च्या महाजालात!
मराठी साहित्यातील काही साहित्यिकांवर संकेतस्थळे तयार करण्यात आली असून त्या निमित्ताने मराठी साहित्यिक आता इंटरनेटच्या महाजालात आले आहेत. या महाजालात सध्या जी. ए. कुलकर्णी, कवी, गीतकार आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यासह कथालेखक व नाटककार रत्नाकर मतकरी आदींचा समावेश असून लवकरच गो. नि. दांडेकर यांच्यावरील संकेतस्थळही सुरू होणार आहे.
जी. ए. कुलकर्णी यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी असे असून त्यांच्या समग्र साहित्याची नोंद www.gakulkarni.info या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांचा जीए यांच्यावरील लेख यावर असून हे संकेतस्थळ इंग्रजीत आहे. जीए यांच्या तीन कथा येथे वाचता येतात. पु. ल. देशपांडे यांच्यावरील www.puladeshpande.net संकेतस्थळावर ‘अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता, किती घेशील दो कराने’ असे वाक्य दिले असून पुलंचे साहित्य आणि मराठी रसिकांना त्यांनी आजवर जे जे काही दिले आहे, ते पाहता, ते वाक्य सार्थ असल्याचे पटते. या संकेतस्थळावर साहित्यिक पुल, छोटय़ांसाठी पुल, विज्ञानप्रेमी पुल, संगीतमय पुल, पुलंची भाषणे, त्यांच्या पुस्तकांची यादी असे सर्व वाचायला मिळते. गदिमांवरील www.gadima.com संकेतस्थळ मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असून ते दृकश्राव्य व लिखित स्वरुपात आहे. गदिमांवरील लघुपटापासून ते त्यांचे अजरामर गीतरामायण, जोगिया हा काव्यसंग्रह, चित्रपटातील गाणी, ललित लेखन याची माहिती मिळते. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यावरील
www.kusumagraj.org या संकेतस्थळावर त्यांचा जीवनपट, साहित्याची सूची, पुरस्कार, छायाचित्रे पाहायला मिळतात. रत्नाकर मतकरी यांच्या www.ratnakarmatkari.com या संकेतस्थळावर मतकरी यांनी आजवर लिहिलेली नाटके, बालनाटय़े, मालिका, त्यांचा परिचय, कथालेखन याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ इंग्रजीत आहे. गो. नि. दांडेकर यांच्यावरील www.goneeda.com हे संकेतस्थळ लवकरच सुरू होणार असल्याची नोंद संकेतस्थळाच्या पानावर देण्यात आली आहे. इंग्रजी भाषेतील साहित्य आणि साहित्यिकांच्या तुलनेत मराठीतील साहित्यिक कमी संख्येने इंटरनेटवर असले तरी ही चांगली सुरुवात असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींनी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी

काहिली करणाऱा उन्हाळा सुसह्य

ढगाळ वातावरणाने काहिली करणारा उन्हाळा सुसह्य
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अंगाची काहिली करणारा उन्हाळा मुंबईकरांसाठी थोडासा सुसह्य झाला. येत्या २४ तासातही मुंबई आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळलेले असेल, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी मुंबईत ग्रॅण्टरोड व अन्य काही भागात तसेच ठाणे, डोंबिवली परिसरात काही क्षण पावसाचा शिडकावा झाला. या बाबत वेधशाळेकडे विचारणा केली असता, पावसाचा शिडकावा झाल्याची कोणतीही नोंद झाली नसल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दिवसाच्या तापमानाची नोंद ३६ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यत होत होती. मात्र आज अधूनमधून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाळ्याच्या तडाखा थोडासा कमी झाला. आज सकाळी साडेआठवाजेपर्यंत कुलाबा येथे ३४.९ (कमाल) व २४.८ (किमान) तसेच सांताक्रूझ येथे ३७.१ (कमाल) व २४.९ (किमान) तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ३४.५ व २४.८ इतक्या कमाल आणि किमान तापमानाची तर सांताक्रूझ येथे ३७.५ व २४.९ इतक्या कमाल व किमान तापमानाची नोंद झाली.

Thursday, April 23, 2009

प्रचार फेरीचा प्रवाह चालला हो

प्रचारफेरीचा प्रवाह चालला हो..!
सुरेश गंभीर (शिवसेना) -
भगवे झेंडे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले बिल्ले, भगव्या साडय़ा परिधान केलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यां आणि तडतड वाजणारा ताशा.. हे चित्र असते दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्या प्रचारफेरीचे. बुधवारी सकाळी धारावीतील खांबदेवनगर, नव्वद फूट रस्ता परिसरातील शिवसेना शाखेपासून गंभीर यांच्या धारावीतील प्रचारफेरीला सुरुवात झालेली असते..
अरुंद गल्ल्या आणि एकमेकांना लागून असलेली घरे. सकाळची वेळ असल्याने जवळपास प्रत्येक गल्लीतील घराघरात पाणी भरणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे अशी कामे चाललेली. गंभीर प्रत्येक घरापाशी जाऊन घरातील मंडळींना नमस्कार करतात तर महिला पदाधिकारी घरातल्यांना, तीस तारखेला मतदानाला या व धनुष्यबाण लक्षात ठेवा, अशी आठवण करून देतात. मुस्लिम वस्ती असलेल्या मदिना चाळ येथेही गंभीर यांचे उत्स्फूर्त स्वागत होते. पुढे गोपीनगर वसाहत, कुंचेकोरी समाज, भंडारी समाज, रामगुंफा, बसवेश्वर भाग येथून प्रचारफेरी पुढे सरकते. येथे एका मराठी भाषिक महिलेकडून गंभीर यांना औक्षण केले जाते. औक्षण केल्यानंतर पेढय़ाचा प्रसाद दिला जातो. हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद असल्याचे ती महिला सांगते. त्यावर गंभीर आणि कार्यकर्ते हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचाच आशिर्वाद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतात.
धारावीतील ढोरवाडा नंतर पुढे गांधीमैदानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गंभीर पुष्पहार अर्पण करतात. तेथे मुस्लिम समाजाकडून त्यांचे स्वागत केले जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले सईद बक्कलवाला आघाडीवर असतात. धारावीतील शंकरकवडे चाळ, धारेश्वर शिवमंदिर आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढत प्रचारफेरी पुढे सरकते. धारावी शास्त्रीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत मराठी भाषिकांबरोबरच तामिळ लोकांची संख्या खूप मोठी. त्यामुळे येथे सर्व घोषणा आणि मतदान करण्याचे आवाहन तामिळी भाषेत केले जाते. ‘विलंबू, विलंबू’ अशी घोषणेबाबत याचा अर्थ ‘धनुष्यबाण’ असल्याचे एक कार्यकर्ता स्पष्ट करतो. पुढे गजानन सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्रीन पॅलेस या मोठय़ा इमारतींमध्ये गंभीर आणि त्यांचे सहकारी पोहोचतात. दुपारचा एक वाजायला आलेला असतो. प्रचारफेरी शेवटच्या टप्प्यात आलेली असते. महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण संस्थेत गंभीर यांना औक्षण केले जाते. आता प्रचार संपलेला असतो. गंभीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तयारी सुरू असते ती दुपारनंतर धारावीच्या पुढील परिसरातील प्रचारफेरीच्या नियोजनाची..

कोमसापच्या साहित्य संमेलनात

कोमसाप’ साहित्य संमेलनात कार्यक्रमांची मेजवानी
मुंबई, २३ एप्रिल / प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेचे ११ वे कोकण मराठी साहित्य संमेलन येत्या ९ व १० मे रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात विविध साहित्य विषयक कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर करणार असून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर समारोपास ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार शं. ना. नवरे व रामदास फुटाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साप्ताहिक ‘लोकप्रभा’चे संपादक प्रवीण टोकेकर यांनी विश्वास पाटील यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीसह लोक साहित्यातील सासू-सुनेचे नाते बदलले आहे का, या विषयावर अनुभ कथन, ग्रंथदिंडी, आजच्या मराठी कवितेतील छंद हरवला आहे का, मराठीचिये बोली कवतिके, काव्यसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींसाठी एका व्यक्तीकरता ८०० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी प्रत्येकी ३०० रुपये असे शुल्क ठेवण्यात आले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८६० ०१४ ३९२/९४२१ १३९ ४९० किंवा ०२३५७-२३५३५० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समग्र हिंदी साहित्य लवकरच इंटरनेटवर

समग्र हिंदी साहित्य आता लवकरच इंटरनेटवर!
प्रतिनिधी
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये एक स्तुत्य उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने राबविण्याचे ठरवले असून या महत्वाकांक्षी प्रयोगामुळे हिंदी भाषेतील समग्र साहित्य आता लवकरच इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
इंग्रजी भाषेतील निवडक आणि दर्जेदार साहित्य क्लासिक रिडर डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध असून येथे क्लिक केल्यानंतर इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखकांचे साहित्य वाचता येऊ शकते. इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेतील समग्र साहित्य भारतासह जगभरातील हिंदी साहित्य प्रेमींना वाचता यावे, या उद्देशाने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत समग्र हिंदी साहित्यातील सुमारे एक लाखांहून अधिक पाने इंटरनेटवर टाकण्यात येणार आहेत. यामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदी साहित्य प्रेमी आणि वाचक घरबसल्या एका क्लिकवर हिंदी साहित्यातील कथा, कवितांसह अन्य साहित्याचा आस्वाद घेऊ शकतील. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या ६६६.ँ्रल्ल्िर५्र२ँ६ं.१ॠ या संकेतस्थळावर हे हिंदी साहित्य वाचता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी दोन कोटी रुपये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आले आहेत. हिंदी भाषेतील ज्या लेखकांच्या साहित्यावरील स्वामीत्वधनाचा (कॉपीराईट)चा अधिकार संपुष्टात आला आहे, त्या लेखकांचे साहित्य प्रारंभी या संकेतस्थळावर देण्यात येणार असून अन्य हिंदी साहित्यिक आणि प्रकाशकांची परवानगी घेऊन त्यांचे साहित्यही येथे देण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र संपादक मंडळ नियुक्त करण्यात येणार असून या मंडळाकडून इंटरनेटवर जे साहित्य देण्यात येणार आहे, त्याची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पानंतर विविध परदेशी भाषांमध्येही निवडक हिंदी साहित्याचा अनुवाद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून यात इंग्रजीसह फ्रेंच, जर्मनी, इटालियन, रशियन, चीनी यांचा समावेश आहे.

Tuesday, April 21, 2009

मराठीत आता डिजिटल पुस्तके

मराठीत आता डिजिटल पुस्तके!
प्रतिनिधी
इंटरनेट आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड नेहमीच करण्यात येत असते. काही प्रमाणात त्यात तथ्यही असले तरी त्याविषयी केवळ ओरड न करता संगणक, इंटरनेटचा वापर करून विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न ‘एमएमएस डिजीटल’ या कंपनीने केला आहे. त्यापैकी काही पुस्तके सीडी व ऑडिओ स्वरुपात प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके आणि मासिके आता थेट डिजीटल स्वरुपात इंटरनेटवरूनही सशुल्क डाऊनलोड करता येऊ शकतील. उत्कर्ष प्रकाशन आणि उत्कर्ष बुक सव्र्हीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
परदेशात असलेल्या मराठी मंडळींना थेट मराठी पुस्तके विकत घेता यावीत आणि त्यांच्यात मराठी वाचनाची आवड वाढावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील नेटसॅव्ही वाचक तसेच विद्यार्थी व तरुणांकडून इंटरनेटचा केला जाणारा वापर याचा विचार करून या पुस्तकांच्या सीडी आणि ऑडिओ सीडीही तयार करण्यात आल्या आहेत.
सध्या देवाघरचा पाऊस (रवींद्र पिंगे), गिरकी (मंगला गोडबोले) ही पुस्तके सीडी आणि ऑडिओ अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहेत. तर सुदाम्याचे पोहे (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर), समृद्धीच्या मार्गावर (आर. एम. लाला), ताजतवानं व मुद्रा (सुधीर गाडगीळ), अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक (डॉ. एम. कटककर), खरा तो एकची धर्म (प्रा. राम शेवाळकर), जाणता अजाणता, लेकुरवाळी व इतस्तत: (शांता शेळके), पांढऱ्यावर काळे (व्यंकटेश माडगूळकर) आदी पुस्तके सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
उपलब्ध असलेली ही पुस्तके संगणकाच्या माध्यमातून वाचता आणि ऐकताही येणार आहेत. तर काही पुस्तके सशुल्कथेट इंटरनेटवरून डिजीटल स्वरुपात डाऊनलोड करून घेता येऊ शकतील.
या पुस्तकांसह मराठीतील माहेर, मेनका आणि विपुलश्री आदी मासिकेही डिजीटल स्वरुपात या कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत. सध्या तरी उत्कर्ष प्रकाशनाचीच पुस्तके या उपक्रमाअंतर्गत डिजीटल व सीडी स्वरुपात उपलब्ध असली तरी लवकरच अन्य प्रकाशकांचीही पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे उपक्रमाच्या प्रकाशन विभागाकडून सांगण्यात आले.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना ०२०-२५५३७९५८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा www.mmsdigital.com या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

मेघदूताचे अंतरंग

नेहरू सेंटरमध्ये उलगडणार ‘मेघदुता’चे अंतरंग!
मुंबई, २१ एप्रिल / प्रतिनिधी
संस्कृत महाकवी कालिदास यांनी रचलेल्या ‘मेघदूत’ या महाकाव्याला मराठी साहित्यात अनन्य साधारण स्थान असून मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या महाकाव्याचा मराठीत अनुवादही झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनीही या महाकाव्याचा अनुवाद केला असून येत्या १ मे रोजी मुंबईत या मेघदुताचे अंतरंग एका कार्यक्रमाद्वारे उलडणार आहे.
नेहरू सेंटरने सायंकाळी साडेसहा वाजता ‘मेघदूत एक महाकाव्य’ या नृत्यनाटिकेचे आयोजन केले आहे.या नृत्यनाटिकेबरोबरच कार्यक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले छायाचित्र प्रदर्शन. मेघदूताची रचना करताना कालिदास यांनी ज्या ज्या परिसरावरून मार्गक्रमण केले तो केवळ कल्पनेचा भाग नव्हता हे आता सिद्ध झाले आहे. डॉ. एस. व्ही. भावे यांनी कालिदासाने ज्या मार्गाने प्रवास केला त्या रामगिरी पर्वत म्हणजेच आजचे रामटेक ते हिमालयातील अलकापुरी या मार्गाने विमान प्रवास करून ते सर्व वर्णन आणि प्रदेश खरा असल्याचे दाखवून दिले आहे. डॉ. भावे यांनी या प्रवासाची छायाचित्रे काढली असून त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमाची संकल्पना एल. ए. काझी यांची असून सदानंद डबीर यांनी कार्यक्रम संहितेचे लेखन केले आहे. नृत्यनाटिकेचे दिग्दर्शन झेलम परांजपे यांचे तर संगीत आनंद मोडक यांचे आहे. ज्ञानेश पेंढारकर, माधुरी करमरकर, मंदार आपटे यांनी यातील गाणी गायली आहेत.

समग्र माहितीची ज्ञानगंगा

जग, भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र माहितीची ‘ज्ञानगंगा’!
प्रतिनिधी
जग, भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि भौगोलिक विषयांसह अन्य अनेक विषयांची समग्र माहिती आता ‘ज्ञानगंगा’ या सीडीद्वारे उपलब्ध झाली आहे. शैलानी सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीने ही सीडी तयार केली असून गेल्या महिन्यात महाबळेश्वर येथे झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. या सीडीमध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध छायाचित्रे आणि नकाशे देण्यात आले असून भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे कार्य, शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यटन, धर्म, भाषा, संगीत आदी विषयांची संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्त्येक जिल्ह्याची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, तेथील हवामान यासह प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ०२०-४००५६५५४ किंवा ०२५६१-२२४९४१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Monday, April 20, 2009

साहित्य संमेलन अवघ्या चाळीस लाखांत

महाबळेश्वर साहित्य संमेलन अवघ्या ४० लाखांत!
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे गेल्या महिन्यात ८२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग पार पडला. संमेलन आयोजनातील या नॅनो प्रयोगात आता ‘नॅनो’ खर्चाचीही नव्याने भर पडली आहे. गेल्या काही वर्षांतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात खूपच कमी खर्चात पार पडलेले साहित्य संमेलन म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनाची नोंद होणार आहे. या साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे चाळीस लाखांच्या घरात झाल्याचे संमेलन आयोजन समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणे केली होती. दरवर्षी भरणाऱ्या या साहित्य संमेलनांचा खर्च एक ते दोन कोटी रुपयांवर गेला होता. संमेलनांवर होणाऱ्या या वाढत्या खर्चाबाबत साहित्य क्षेत्रातील जाणकारांकडून काही प्रमाणात नाराजीही व्यक्त केली जात होती. संमेलनांवरील हा भरमसाठ खर्च, भपकेबाजपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे बोलले जात होते.
महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अनेक प्रकारांनी गाजले. त्यात संमेलनाला संमेलनाध्यक्षच नाही, संमेलनापूर्वी संमेलनाध्यक्षाने राजीनामा देणे, संमेलनाध्यक्षाच्या भाषणाच्या प्रती साहित्य रसिकांना न मिळणे आदी गोष्टींचा समावेश होता. त्यात आता गेल्या काही वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात कमी खर्चात झालेले साहित्य संमेलन म्हणून याची नोंद होणार आहे.
महाबळेश्वर हे प्रामुख्याने पर्यटन व्यवसायाचे शहर असल्याने तेथे आजवरच्या साहित्य संमेलनाला जशी गर्दी झाली, तशी होणार नाही, हे आम्ही गृहीत धरलेले होते. तरीही उद्घाटन सोहळ्याला किमान पाच हजार रसिक उपस्थित होते. तर प्रतिनिधी नोंदणी करून सुमारे बाराशे ते पंधराशे रसिक उपस्थित होते. संमेलनासाठी आलेले साहित्य रसिकांची तीन दिवसांचा निवास, चहा, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आदी सर्व सोय केवळ बाराशे रुपयांत व ती ही चांगल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. हा सुद्धा महाबळेश्वर संमेलनाचा नवा पायंडा होता. कारण नावनोंदणी केलेल्या साहित्य रसिकांची सोय यापूर्वी शाळा-महाविद्यालयांच्या वर्गातून केली जात होती, असेही आयोजन समितीच्या अन्य एका सदस्याने सांगितले.
साहित्य संमेलनाच्या खर्चाचे सर्व हिशोब येत्या एक-दोन दिवसात अंतिम केले जाणार असल्याचेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मराठीत आता डिजिटल पुस्तके

मराठीत आता डिजिटल पुस्तके!
मुंबई, १९ एप्रिल / प्रतिनिधी
इंटरनेट आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड नेहमीच करण्यात येत असते. काही प्रमाणात त्यात तथ्यही असले तरी त्याविषयी केवळ ओरड न करता संगणक, इंटरनेटचा वापर करून विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न ‘एमएमएस डिजिटल’ या कंपनीने केला आहे. त्यापैकी काही पुस्तके सीडी व ऑडिओ स्वरुपात प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके आणि मासिके आता थेट डिजिटल स्वरुपात इंटरनेटवरूनही सशुल्क डाऊनलोड करता येऊ शकतील. उत्कर्ष प्रकाशन आणि उत्कर्ष बुक सव्‍‌र्हीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
परदेशात असलेल्या मराठी मंडळींना थेट मराठी पुस्तके विकत घेता यावीत आणि त्यांच्यात मराठी वाचनाची आवड वाढावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील नेटसॅव्ही वाचक तसेच विद्यार्थी व तरुणांकडून इंटरनेटचा केला जाणारा वापर याचा विचार करून या पुस्तकांच्या सीडी आणि ऑडिओ सीडीही तयार करण्यात आल्या आहेत.
सध्या देवाघरचा पाऊस (रवींद्र पिंगे), गिरकी (मंगला गोडबोले) ही पुस्तके सीडी आणि ऑडिओ अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहेत. तर समृद्धीच्या मार्गावर (आर. एम. लाला), ताजतवानं व मुद्रा (सुधीर गाडगीळ), अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक (डॉ. एम. कटककर), खरा तो एकची धर्म (प्रा. राम शेवाळकर), जाणता अजाणता, लेकुरवाळी व इतस्तत: (शांता शेळके), पांढऱ्यावर काळे (व्यंकटेश माडगूळकर) आदी पुस्तके सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
उपलब्ध असलेली ही पुस्तके संगणकाच्या माध्यमातून वाचता आणि ऐकताही येणार आहेत. तर काही पुस्तके सशुल्कथेट इंटरनेटवरून डिजीटल स्वरुपात डाऊनलोड करून घेता येऊ शकतील. या पुस्तकांसह मराठीतील माहेर, मेनका आणि विपुलश्री आदी मासिकेही डिजीटल स्वरुपात या कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत. सध्या तरी उत्कर्ष प्रकाशनाचीच पुस्तके या उपक्रमाअंतर्गत डिजीटल व सीडी स्वरुपात उपलब्ध असली तरी लवकरच अन्य प्रकाशकांचीही पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे उपक्रमाच्या प्रकाशन विभागाकडून सांगण्यात आले.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना ०२०-२५५३७९५८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा www.mmsdigital.com या संकेतस्थळावरही संपर्क साधता येईल.

लंडन बुक फेअर

लंडन बुक फेअर’मध्ये अवघ्या दोन मराठी प्रकाशकांचा सहभाग
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
जगभरातील प्रकाशक आणि साहित्यप्रेमी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘लंडन बुक फेअर’ मध्ये भारतातील सुमारे शंभर प्रकाशन संस्था सहभागी होत असून त्यात मराठीतील अवघ्या दोन प्रकाशकांचा समावेश आहे. येत्या २० ते २२ एप्रिल या कालावधीत लंडन येथे हा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या बुकफेअरमध्ये भारताला विशेष अतिथी देश म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
इंग्रजी भाषेनंतर सर्वात जास्त पुस्तके प्रकाशित करणाऱ्या अमेरिका, इंग्लंड नंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात २३ हून अधिक भाषांमध्ये दरवर्षी सुमारे ८० हजार पुस्तके प्रकाशित होत असतात. त्यात हिंदी, बंगाली आणि अन्य काही प्रादेशिक भाषांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात प्रकाशित होत असतात. मराठीचा सहभाग हिंदूी आणि बंगाली भाषांच्या तुलनेत कमी असतो, ही वस्तुस्थिती आहे. लंडन बुक फेअर दरवर्षी आयोजित करण्यात येत असून जगभरातून हजारो पुस्तक प्रकाशक, विक्रेते, लेखक यात सहभागी होत असतात. मात्र मराठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांचा मात्र आजवर यात सहभाग नव्हता. यंदाच्या वर्षी मात्र पुणे येथील मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील व अनिल मेहता आणि नाशिकच्या करिअर पब्लिकेशन्सचे निषाद देशमुख हे यात सहभागी होत आहेत.
भारतात दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ८० हजार पुस्तकांमध्ये सुमारे १८ हजार पुस्तके ही इंग्रजी भाषेतील असतात. यंदाच्या लंडन बुक फेअरमध्ये अभिनव पब्लिशर्स, डायमंड पॉकेट बुक्स, साहित्य अकादमी, पुस्तक महल आणि अन्य प्रकाशक सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या या पुस्तक महोत्सवात २१ एप्रिल रोजी भारतीय परंतू इंग्रजी भाषेत लिहिणारे लेखक विक्रम सेठ यांची ‘ऑथर ऑफ द डे’ म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच अमर्त्य सेन, गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती, तरुण तेजपाल, जावेद अख्तर आदी लेखकांनाही या पुस्तक महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. जगभरातील सुमारे १०९ देश यंदाच्या पुस्तक महोत्सवात सहभागी होणार आहेत.
मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, गेल्यावर्षीपर्यंत लंडन बुक फेअरमध्ये कोणीच मराठी प्रकाशक सहभागी होत नव्हते. यंदा मी, अनिल आणि नाशिकचे निषाद देशमुख १८ एप्रिल रोजी महोत्सवात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहोत. तीन दिवसांच्या महोत्सवात लेखकांची मुलाखत, पुस्तक प्रकाशन, काव्य वाचन, परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

वाचकच उदासीन

ललित’ चोखंदळ वाचकनिवडीसाठी वाचकच उदासीन!
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
‘ललित’ मासिकाकडून मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ या उपक्रमासाठी वाचकांनीच यंदाच्या वर्षी अत्यल्प प्रतिसाद दिला. मासिकातर्फे विविध क्षेत्रातील पाचशे जणांची निवड करून वाचलेल्या पुस्तकांपैकी आपली आवड कळविण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त १७३ जणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. या वाचक निवडीत मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘आर्त’ या पुस्तकाला सर्वाधिक म्हणजे २४ वाचकांनी आपली पसंती कळवली आहे.
मराठीतील सुजाण आणि चोखंदळ वाचकांना एकमेकांच्या आवडीची कल्पना यावी आणि गेल्या वर्षभरात कोणती चांगली पुस्तके वाचली गेली, त्याची माहिती इतर वाचकांना व्हावी, या उद्देशाने १९६५ पासून म्हणजेच गेल्या ४३ वर्षांपासून चोखंदळ वाचकांची निवड हा उपक्रम ‘ललित’ मासिक राबवत आहे. २००८ या वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जी पुस्तके वाचली गेली व वाचकांना आवडली, त्याचा शोध घेण्यासाठी बृहन्महाराष्ट्रातील पाचशे जणांना पत्र पाठवून पुस्तके कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
चोखंदळ वाचकांकडून निवड करण्यात आलेली अन्य पुस्तके आणि ती निवड केलेल्या वाचकांची संख्या अशी - मॅजेस्टिक कोठावळे (१७), गंगा आए कहॉसे-मूळ लेखक-गुलजार, अनुवाद-विजय पाडळकर (१७), पाणीयावरी मकरी-प्रा. राम शेवाळकर (१६), त्या वर्षी- शांता गोखले (१३) मनश्री-सुमेध वडावाला-रिसबूड (१३), वारी-एक आनंदयात्रा-संदेश भंडारे (११), शांताराम पारितोषिक कथा (९), पुन्हा मर्ढेकर, संपादन-डॉ. विजया राजाध्यक्ष (९), गाथा इराणी-मीना प्रभू (११), सर्वोत्तम सरवटे-संपादन-अवधूत परळकर (९), रुजवात-डॉ. अशोक रा. केळकर, (९), कॉल आफ द सीज्-चंद्रमोहन कुलकर्णी(७), अल्पसंख्य-विजय पाडळकर (७), भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा, खंड १ व २- संपादिका-डॉ. मंदा खांडगे व डॉ. निलीमा गुंडी, डॉ. विद्या देवधर व डॉ. निशिकांत मिरजकर, (७), खुंदळघास-सदानंद देशमुख (८) आदी पुस्तकांचाही समावेश आहे.

दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून

मंदीचा तडाखा, त्यात उन्हाचा कडाका
थेट मतदारसंघातून (दक्षिण मध्य मुंबई)
शेखर जोशी / कैलास कोरडे
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखेपूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक प्रचार समाप्त होतो. त्यामुळे मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघातील प्रचार २८ तारखेला सायंकाळी पाच वाजता समाप्त होईल. प्रचार संपायला बरेच दिवस शिल्लक असले तरी मुंबईला अद्यापही निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही. हा मतदारसंघही त्यास अपवाद नाही. मुंबईतील पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र मुंबईतील लोकसभा निवडणुकीचे वातावरण अद्याप तापले नसल्याचे दक्षिण मध्य मुंबईतही सर्वत्र ऐकायला मिळते. त्याची दोन कारणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाली. त्यापैकी एक म्हणजे आचारसंहितेमुळे पोस्टर व बॅनरबाजी पूर्णत: बंद झाली असून, गाडय़ांवर भोंगा लावून किंवा भिंती रंगवून वातावरणनिर्मितीचा जमाना राहिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे मंदीच्या तडाख्यामुळे आणि उन्हाच्या कडाक्यामुळे कार्यकर्त्यांचा निवडणूक प्रचारातील सहभाग घटला आहे. परिणामी ज्या भागात उमेदवार फिरत असतो, केवळ तेथेच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते. इतर वेळी अगदी पक्ष कार्यालयातही शुकशुकाट असतो.
येत्या दोन-तीन दिवसांत प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू होईल, असे माटुंगा येथील काँंग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने सांगितले. त्यामागील कारण विचारले असता तो म्हणाला की, आतापर्यंत केवळ तालुका पातळीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे कार्यकर्त्यांना प्रचारात उतरविण्यासाठी सुरू होते. एकदा का या कार्यकर्त्यांनी प्रचारात उडी घेतली की, निवडणूक प्रचारात आपोआप रंग भरलेले दिसतील. हे खरे असले तरी, याआधी झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद थंडच आहे. दक्षिण-मध्य मुंबईत सर्वच राजकीय पक्षांना हे जाणवत असले, तरी उघडउघड हे सत्य स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. खासगीत मात्र राजकीय पक्षांचे पदाधिकारी ही बाब मान्य करतात.
मतदारसंघांच्या फेररचनेमुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे क्षेत्रही बरेच विस्तारले आहे. दक्षिणेला एलिफिन्स्टन ब्रिजपासून सुरू होणाऱ्या या मतदारसंघात माहीम ते भक्ती पार्क पर्यंतचा शहर हद्दीतील भाग आहे. याखेरीज सुमन नगर ते घाटकोपर नाला आणि अणुशक्ती नगपर्यंत भाग तसेच पूर्व द्रूतगती महामार्गापासून ते माहूलपर्यंतचा भाग या मतदारसंघात आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करणे शक्य नाही. प्रत्येक इमारतीला भेट देणेही अशक्य आहे. परिणामी पुढील दहा-पंधरा दिवसांत पदयात्रा, रोड शो, जाहीर सभा आणि मेळावे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची ‘स्ट्रॅटेर्जी’ पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितली. याखेरीज झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ांमधील प्रभावशाली मंडळीशी बैठका करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. या साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात पक्षांच्या चिन्हांचे फलक, झेंडे, कार्यकर्त्यांसाठी टोप्या, मफलर आदींचे ढीग पडलेले दिसत आहेत. प्रत्येक पक्षाकडून कितीही जोरदार तयार असली तरी सर्वसामान्य मतदार अद्यपही गोंधळलेल्या स्थितीत आहेत. आपण कोणत्या मतदारसंघात मोडतो, हेही कित्येकांना ठाऊक नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे २००४ मध्ये असलेला उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदार संघ आता दक्षिण मध्य मुंबई झाला आहे. या मतदारसंघात माहीम, वडाळा, शीव-कोळीवाडा, अणुशक्तीनगर आणि चेंबूर असे पाच विधानसभा मतदार संघ येतात. या मतदार संघात विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), विद्यमान आमदार सुरेश गंभीर (शिवसेना) आणि श्वेता परुळकेर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अशी प्रमुख तिरंगी लढत होणार आहे. या प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा चेहरा वेगवेगळा आहे. मतदार संघांच्या या चेहऱ्याचा व तेथील विविधरंगी वातावरणाचा अनुभव येथे फेरफटका मारताना सहज जाणवतो. दादर, प्रभादेवी आणि माहीम परिसरात मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांची मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. मोठमोठे टॉवर्स, आलिशान बंगले आणि मोठय़ा संख्येतील सहकारी गृहनिर्माण संस्था, शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट कार्यालये, शिवाजी पार्क याच मतदार संघात येतात.
गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप युती आणि बहुजन समाज पक्ष यांच्या दोन मोठय़ा सभा येथे झाल्या. लालकृष्ण अडवाणी व मायावती या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या येथे सभा झाल्या. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना मुंबईतील निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी १९ आणि २६ एप्रिल असे दोन रविवार मिळणार आहेत. शिवसेना-भाजप युती, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आणि मनसेसह अन्य सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी सध्या तरी प्रचाराचा सर्व भर हा घरोघरी फिरण्यावर आणि वैयक्तिक संपर्कावर दिला असल्याचे चित्र या मतदार संघात पाहायला मिळाले. चाळी, मोठमोठे टॉवर्स, सहकारी गृहनिर्माण संस्था येथे उमेदवार आणि त्याच्या बरोबरचे कार्यकर्ते फिरत आहेत. काहीजण रेल्वेस्थानक, भाजीमार्केट, महाविद्यालये येथे जाऊनही मतदारांना भेटत आहेत. ‘जसा मतदार तसा प्रचार’ असे सूत्र राजकीय पक्षांनी ठेवले आहे. राजकीय पक्षांच्या महिला शाखा, विद्यार्थी संघटना तसेच काही सामाजिक मंडळे, संस्था यांच्या माध्यमातूनही राजकीय पक्ष निवडणूक प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या मतदार संघात मोठय़ा प्रमाणात दलित, मुस्लिम व दक्षिण भारतीय मतदार असून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकाच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असतात. अद्यापतरी अशा मोठय़ा स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा झाल्या नसल्या तरी शेवटच्या टप्प्यात त्याला अधिक जोर येईल. ‘मनसे’कडे मराठी नाटय़-चित्रपट व दूरदर्शन मालिकांमधील बरीच कलाकार मंडळी आहेत. मनसेच्या श्वेता परुळेकर यांच्या प्रचारासाठी या मंडळींना शेवटच्या टप्प्यात उतरवले जाईल, असे सांगण्यात येते. मतदार संघातील विविध राजकीय पक्ष कार्यालयांचा कानोसा घेतला असता निवडणुकीच्या तयारीबरोबरच त्या अनुषंगाने येणारी अन्य कामे करण्यात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचे काम यापूर्वीच झाले आहे. मतदार याद्यांची तपासणी, आपले किती मतदार त्या दिवशी येऊ शकतात, त्यांना मतदानाला कसे आणायचे, मतदारांचे नाव, मतदान केंद्र आदींचा तपशील काही वर्षांंपूर्वीपर्यंत हाताने लिहून कार्यकर्ते नेऊन द्यायचे. आता हे काम संगणकावर केले आहे. तरुण मतदारांवर एसएमएस तसेच ऑर्कूट आणि अन्य कम्युनिटीच्या माध्यमातून स्र्कॅपद्वारे आपले आवाहन कसे पोहोचवावे, यावरही चर्चा सुरू आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऐन उन्हाळ्यात होणारी ही निवडणूक आणि मे महिन्याच्या सुट्टीमुळे मतदार गावी जाऊ नयेत म्हणून राजकीय पक्ष व त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी कशी करायची, त्याचीही स्ट्रॅटेजी कार्यालयातून आखली जात आहे.

कोसबाड टेकडी वार्तापत्र

कोसबाड टेकडी वार्तापत्र’ची पारितोषिकासाठी निवड
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी
कवी प्रफुल्लदत्त स्मारक समितीने दिलेल्या देणगीतून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या कवी प्रफुल्लदत्त पारितोषिकासाठी ‘कोसबाड टेकडी वार्तापत्र’ची निवड करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार ‘आदर्श व कुशल संपादक’ या गटासाठी देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी गिरिजा कीर व डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या परीक्षक समितीने ग्राम बाल शिक्षा केंद्र, कोसबाड टेकडी, तालुका-डहाणू, जिल्हा-ठाणे यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या या वार्तापत्राची निवड केली आहे.येत्या २५ एप्रिल रोजी मुंबई ज्येष्ठ साहित्यिक प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

शक्ती सामंता यांचे निधन

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे निधन
मुंबई, ९ एप्रिल / प्रतिनिधी
‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे आज सायंकाळी सांताक्रूझ येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सामंता यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. प. बंगालमध्ये जन्मलेले सामंता कोलकाता विद्यापीठातून १९४४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता होण्याच्या उद्देशाने मुंबईत आले. रत्नागिरीजवळील दापोली येथे त्यांनी शिक्षक म्हणूनही काही काळ नोकरी केली. १९४८ मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. १९५४ मध्ये सामंता यांनी ‘बहू’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर ‘इन्स्पेक्टर’, ‘शेरु’, ‘डिटेक्टीव्ह’ आदी चित्रपट दिग्दर्शित केले. पुढे १९५७ मध्ये त्यांनी स्वत:ची ‘शक्ती फिल्म’ ही कंपनी स्थापन केली. त्यांच्या कंपनीचा पहिला चित्रपट ‘हावडा ब्रिज’ हा होता. शक्ती सामंता यांनी ५० ते ६० च्या दशकात शम्मी कपूर, राजेश खन्ना यांच्यासमवेत काम केले. हावरा ब्रिज, कश्मीर की कली, अ‍ॅन इव्हीनिंग इन पॅरिस, अमानुष, बरसात की एक रात असे, इन्सान जाग उठा, एक राझ, अनुराग, अजनबी, मेहबुबा, अनुरोध, दि ग्रेट गॅम्बलर, अलग अलग असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.
सामंता यांना आराधना, अनुराग व अमानुष या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. झी टीव्हीतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

आगामी साहित्य संमेलन दिल्लीत

आगामी साहित्य संमेलन दिल्लीत?
दोन महिन्यांत निर्णय होणार
प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्षपदाची कारकीर्द पुढच्या वर्षी संपत आहे. आगामी ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाले-पाटील यांच्याच अधिपत्याखाली पार पडणार असून ठाले-पाटील यांची कार्यपद्धती आणि राजकीय वजन पाहता हे संमेलन नवी दिल्लीतच होण्याची दाट शक्यता साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० मध्ये जानेवारी महिन्यात होईल.
महाबळेश्वर येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. ८२ व्या साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी, ठाणे, परभणी आदी ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. मात्र ठाले-पाटील यांनी हे ८२ वे मराठी साहित्य संमेलन सॅनहोजे येथे भरविण्याचा घाट घातला होता. त्यांच्या या निर्णयावर मराठी साहित्य आणि प्रकाशन वर्तुळातून तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. तरीही ठाले-पाटील सॅनहोजे येथे संमेलन घेण्यावर ठाम होते. हे संमेलन सॅनहोजे येथे झाले असते तर ते महामंडळाच्या घटनेच्या विरोधात ठरले असते. याच्या विरोधात कोणी न्यायालयात दाद मागितली असती तर तांत्रिक मुद्दय़ावर हे संमेलन अडचणीतही येऊ शकले असते. त्यातच रत्नागिरीकरांनी पर्यायी साहित्य संमेलन घेण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे अखेर ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्याची पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे राज्यात घेण्याचे ठाले-पाटील यांना जाहीर करावे लागले. मात्र या सगळ्या प्रकारात ठाले-पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेचा अपवाद वगळता अन्य घटक संस्था व संलग्न संस्थांनी ठाले-पाटील यांच्या हो ला हो म्हटले होते.
महाबळेश्वर साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी पुढील साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाणे, पुणे, परभणी आणि नवी दिल्ली येथून आमंत्रणे आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहे. ८२ वे साहित्य संमेलन भरविण्यासाठाही ठाणे, पुणे, रत्नागिरी, परभणी यांनी आमंत्रण दिले होते. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन हे या पैकी एखाद्या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा आहे.ज्या ठिकाणांहून संमेलनासाठी आमंत्रणे आली आहेत, त्या त्या ठिकाणी महामंडळाची समिती भेट देते आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येतो. मात्र ठाले-पाटील आपले राजकीय वजन आणि प्रतिष्ठा वापरून हे संमेलन दिल्लीतच घेण्याचा तसेच महामंडळ अध्यक्षपदाच्या आपल्या कारकीर्दीतील अखेरचे साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करून आपले वर्चस्व दाखविण्याचा ठाले-पाटील प्रयत्न करतील, अशी चर्चा मराठी साहित्य क्षेत्रात रंगली आहे.

आम्ही मराठी संस्थेचे आवाहन

‘मराठी बोलता येणाऱ्या उमेदवारालाच निवडणुकीत मतदान करा’
‘आम्ही मराठी’ संस्थेचे मराठी नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराला मत देताना राजकीय बांधिलकी न बघता, आपल्या मातीशी बांधिलकी हा निकष ठरवावा, आणि त्यातही त्या उमेदवाराला मराठी बोलता येणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन ‘अवघा मराठी तितुका मेळवावा’ असे घोषवाक्य असणाऱ्या ‘आम्ही मराठी’ या संघटनेने समस्त मराठी नागरिक आणि मराठी बोलता येणाऱ्या जनतेला केले आहे. ‘अवघा मराठी तितुका मेळवावा’ असे घोषवाक्य असले तरी ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ ही आपली कृती असल्याचा इशाराही संघटनेचे कार्याध्यक्ष एकनाथ ताबवेकर व प्रवर्तक संजय भिडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
अठरा वर्षे वयावरील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय जबाबदारी म्हणून स्वत: मतदान करावेच पण इतरांनाही मतदान करण्यास उद्युक्त करावे, आपापल्या मतदार संघातील सर्व उमेदवारांचा साकल्याने विचार करून त्यातल्या त्यात जो उमेदवार स्वच्छ असेल त्याला मतदान करावे, मतदान होत असताना पैसे किंवा वस्तूंचे वाटप, बोगस मतदान आदी अपप्रवृत्तीना आळा घालावा आणि अशा घटनांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, उमेदवार ठरवताना जातीय, धार्मिक, आर्थिक निकष व नातीगोती टाळावी. केवळ शिक्षण आणि गुणवत्ता याच निकषांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे.
केवळ धर्म जनतेला बांधून ठेवू शकत नाही, मात्र भाषा बांधून ठेवू शकते, हे आधुनिक इतिहासातील सत्य बांगलादेशच्या निर्मितीमुळे सिद्ध झाले आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनीही सामाजिक सुधारणेचा वसा घेतला होता, मग महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने त्यांचे नाव का घेतले जात नाही, असा सवाल करून या पत्रकात पुढे म्हटले आहे की, जातीभेदाच्या पुढे जाऊन आणि आरक्षणाच्या मायाजाळात न अडकता नैतिक, आर्थिक, बौद्धिक निकषांच्या पायावर ‘आम्ही मराठी’ ने कामाला सुरुवात केली आहे.
नुकत्याच साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थेचा दुसरा वर्धापनदिन साजरा झाला. या निमित्ताने संस्थेने मराठी लोकांची निष्क्रीय व पराभूत मानसिकता बदलणे, दिल्लीपुढे हुजरेगिरी करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालणे, मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन करणे आदींसाठी काम करण्याचे ठरवले असल्याचेही पत्रकाच्या अखेरीस म्हटले आहे.

पुस्तक प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांची अपेक्षा

पुस्तक विक्रीच्या ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणाला बसलेली खीळ दुर्लक्षित करण्यासारखी नाही
पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांची अपेक्षा
प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग मराठीतील पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना फारसा रुचलेला नाही. या छोटय़ा गावातील साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी संमेलनाच्या निमित्ताने इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच एका ठिकाणी विविध विषयांवरील हजारो पुस्तके हाताळायला व पाहायला मिळाली, ही बाब वाचक म्हणून स्वागतार्ह असल्याचे मत प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक खरेदीची जी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली होती, त्याला महाबळेश्वर साहित्य संमेलनात खीळ बसली या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मतही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथे नुकतेच पार पडलेले ८२ वे साहित्य संमेलन विविध वाद, प्रतिवाद आणि अन्य कारणांमुळे गाजले. महाबळेश्वरची लोकसंख्या सुमारे १२ ते १४ हजार इतकी असून हे शहर प्रामुख्याने पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटकांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांच्या तुलनेत येथे साहित्य रसिकांचा प्रतिसाद कमी असेल, हे गृहीतच होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही संमेलनापूर्वी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाकडे आम्ही एक प्रयोग म्हणून पाहतो आहोत’ असे सांगितले होते. त्यानंतर जे जे काही झाले त्यामुळे एकप्रकारे हे साहित्य संमेलन हा प्रयोगच ठरला आहे.
गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीने एक नवा उच्चांक गाठला होता. येथे साडेतीन ते चार कोटींची पुस्तक विक्री झाली होती. अर्थात येथे पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठीही दररोज हजारो लोकांच्या झुंडी येत होत्या. गेल्या काही वर्षांत सोलापूर, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात काही कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती. साहित्य संमेलन आणि पुस्तकप्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या मोठय़ा गर्दीचा फायदा पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना मिळाला होता. सांगली येथील साहित्य संमेलनात तर प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचे साडेतीनशे स्टॉल होते. महाबळेश्वर येथील संमेलनात ही संख्या सुमारे ८५ ते ९० इतकी कमी होती. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनात २० ते २५ टक्के पुस्तक विक्री झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत पुस्तक विक्रीची जी कोटीच्या कोटी उड्डाणे होत होती, त्याला महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर येथे साहित्य संमेलन घेण्याच्या प्रयोगामुळे गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीचा जो चढता आलेख होता, तो एका फटक्यात खाली उतरला असल्याचे प्रातिनिधिक मत महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्याने पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेचे रमेश राठीवडेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. महाबळेश्वरला आलेले प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनीही याला दुजोरा दिला. छोटय़ा गावात संमेलन घेतल्यामुळे तेथील वाचकांपर्यत हजारो पुस्तके एकाच वेळी पोहोचत असली तरी पुस्तक विक्रीसाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे या मंडळींचे म्हणणे आहे.

भावगीतगायनातील युगपुरुष हरपला

भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला!
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी
गजाननराव वाटवे यांच्या निधनाने मराठी भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला असल्याची भावना संगीतप्रेमी आणि भावसंगीत विश्वात व्यक्त करण्यात येत आहे. वाटवे यांनी मराठी भावगीतांचा पाया घातला आणि ठिकठिकाणी भावगीत गायनाचे कार्यक्रम करून ती रसिकांपर्यंत पोहोचवली. मराठी भावसंगीत लोकप्रिय करण्यात वाटवे यांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रियाही या मान्यवरांनी व्यक्त केली.
यशवंत देव - गजाननराव वाटवे यांच्या निधनाने भावगीतांमधील युगपुरुष हरपला आहे. वाटवे हे कवितेतील, गीतातील भावाला शरण जाऊन गात असत. त्यामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या केवळ ओठावर न राहता थेट हृदयापर्यंत पोहोचत असे. भावगीतांमध्येही त्यांनी अनेक प्रयोग केले. अनेक कवितासंग्रह वाचून ते स्वत: गाण्यांची निवड करत आणि चाल लावून ती गात असत. मी लहान असल्यापासून त्यांचे गाणे ऐकत आलो आहे.
अरुण दाते - भावगीत हा गाण्याचा प्रकार म्हणून ज्यांनी लोकप्रिय केला व त्याला प्रसिद्धी मिळवून दिली, असे गजाननराव वाटवे भावगीतांचे जनक होते. वाटवे यांची अनेक भावगीते त्याकाळी लोकप्रिय झाली आणि आजही आहेत. वाटवे हे पुण्यात कार्यक्रम करायचे तेव्हा पुण्यातील रस्ते रसिकांच्या गर्दीने फुलून जायचे.
मंगेश पाडगावकर - भावगीत गायनाच्या क्षेत्रातील ऋषितुल्य कलावंत, असेच वाटवे यांचे वर्णन करावे लागेल. माझ्या वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी वाटवे यांनी आपल्या गायनाने आम्हाला वेडे केले होते. त्यांच्या ‘वारा फोफावला, दर्या उफाळला’ या गाण्याने आमच्या पिढीला भारून टाकले होते. त्या वयात गणेशोत्सवात खच्चून गर्दीत दोन-दोन तास उभे राहून त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आम्ही ऐकले आहेत. वाटवे यांनी भावगीत गायनाची एक परंपरा निर्माण केली. कवितांची उत्तम जाण, शब्दांचे स्पष्ट व भावपूर्ण उच्चार, गोड व सुरेल आवाज, नाटकीपणा न करता कवितेतील नाटय़ व्यक्त करण्याची सहजता हे वाटवे यांच्या गायनाचे वैशिष्टय़ होते. त्यांनी निर्माण केलेल्या परंपरेत अनेक गायक वाढले. त्यांचे सूर व त्यांच्या स्वररचना मनात घोळवत त्यांचे स्मरण करणे हेच आता शक्य आहे.
गोविंद पोवळे - वाटवे हे सुगमसंगीत आणि भावगीतामधील अढळ ध्रुवतारा होते. जोपर्यंत मराठी संगीत कायम आहे तोपर्यंत वाटवे यांचे नाव आणि त्यांची गाणी रसिकांच्या मनात कायम घर करून राहतील.
विनायक जोशी - मराठी भावगीतांचा ‘सायंतारा’ आता कायमचा लोपला. भावगीत हाच त्यांचा श्वासोच्छवास होता. वाटवे हे भावगीतामधील ‘ताजमहाल’ होते.

ठाल्यांची ठोकशाही

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या मनमानी आणि ठोकशाही कारभारामुळे महामंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सॅनहोजे येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाले-पाटील यांनी जो आटापिटा केला आणि त्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात किंवा भारतात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भरविण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. महामंडळाच्या घटनेनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात किंवा भारतातच झाले पाहिजे. भारताबाहेर साहित्य संमेलन भरवायचे असेल तर त्यासाठी महामंडळाच्या घटनेत बदल करणे गरजेचे होते. मात्र ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे ८२ वे संमेलन भरविण्याचा निर्णय घेतला. विदर्भ साहित्य संघ आणि महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता याला कोणी विरोधही केला नाही. अखेर वृत्तपत्रे व साहित्य वर्तुळातून प्रखर टीका झाल्यानंतर ठाले यांनी नमते घेतले आणि सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन होईल, अशी पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन महाराष्ट्रातच घेण्यास ते राजी झाले.
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे संमेलनाध्यक्षांशिवाय पार पडले.
आजवर झालेल्या साहित्य संमेलनांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. आणि त्यालाही ठाले-पाटील यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यांनी अगोदर खबरदारी घेऊन काही उपाययोजना केली असती तर अध्यक्ष निवडीचा पेच आणि संमेलनाध्यक्षांशिवाय संमेलन पार पडणे या गोष्टी टाळता आल्या असत्या. डॉ. यादव यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी, त्यातील तुकाराम यांच्याविषयी असलेला वादग्रस्त मजकूर, त्यावर वारकरी संप्रदायाकडून उमटलेली प्रतिक्रिया, डॉ. यादव यांचा राजीनामा, डॉ. यादव अध्यक्ष असतील तर हे संमेलन होऊ न देण्याचा इशारा आदी सर्व बाबी काही एका दिवसात घडल्या नाहीत. संमेलनाच्या अगोदर किमान पंधरा ते वीस दिवस हा गदारोळ सुरू होता. त्यामुळे भविष्यात असाधारण परिस्थिती उद्भवली तर काय करायचे, त्यातून कसा तोडगा काढायचा याविषयी ठाले-पाटील यांना अगोदरच पूर्वतयारी करता आली असती. आपल्या घरातही एखादे लग्नकार्य किंवा तत्सम मोठा समारंभ असेल तर सर्वसामान्य माणूसही काही अडचण निर्माण झाली तर काय करायचे, त्याचा विचार करून पूर्वनियोजन करतो. साहित्य संमेलनासारख्या इतक्या मोठय़ा कार्यक्रमासाठी ठाले-पाटील यांनी ही खबरदारी का घेतली नाही, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तसेच महामंडळाच्या घटनेनुसार संमेलन मार्गदर्शन समितीची बैठकही का बोलावली नाही, असे सवाल विचारण्यात येत आहेत. महामंडळाच्या घटनेनुसार (परिशिष्ट-अ, नियम-१२) साहित्य संमेलनाच्या कार्याचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन समिती असते. संमेलनाची निमंत्रक संस्था, आयोजक यांना साहित्य संमेलनाच्या बाबतीत ही समिती वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तर बोलावलीच नाही पण मार्गदर्शन समितीची बैठकही घेतली नाही. या प्रकाराला महाराष्ट्र साहित्य परिषदही तितकीच जबाबदार आहे. हा सर्व वाद सुरू असताना संमेलन निमंत्रक म्हणून महामंडळाची किंवा मार्गदर्शन समितीची बैठक बोलावण्याचा आग्रह का धरला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसाच प्रकार डॉ. यादव यांच्या भाषणाच्या प्रती वितरित न करण्याबाबत ठाले-पाटील यांच्याकडून घडला. महामंडळाच्या घटनेत संमेलन प्रतिनिधींचे अधिकार असे एक प्रकरण आहे. त्यानुसार संमेलनाच्या खुल्या अधिवेशनातील ठरावांवर मत देणे, संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, अध्यक्षीय भाषण आणि अन्य साहित्य मिळणे हा संमेलनासाठी शुल्क भरून नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रतिनिधींचा अधिकार आहे. ठाले-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अध्यक्षीय भाषणाची प्रत संमेलनासाठी आलेल्या प्रतिनिधींना न देऊन महामंडळाच्या घटनेचीही पायमल्ली केली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी होणारे खुले अधिवेशन आणि ठरावांचे वाचन हे संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच झाले पाहिजे, असे महामंडळाची घटना सांगते. मात्र येथे संमेलनाध्यक्ष नसूनही ठरावांचे वाचन केले गेले. त्यामुळे ते ठरावही वैध ठरत नाहीत.
सांगली येथील ८१ व्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका करून ठाले-पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनातही उद्घाटन सोहळ्यात त्यांनी अशीच काही मुक्ताफळे उधळली होती. संमेलनास उपस्थित असलेले प्रतिनिधी आणि वृत्तपत्रातून त्यावर टीका झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ठाले-पाटील यांनी त्या भाषणातील मते आणि विचार हे आपले स्वत:चे असून ते महामंडळाचे नाहीत, अशी सारवासारव केली. महामंडळाच्या सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि अपवाद वगळता महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे ठाले-पाटील यांच्या या मनमानी आणि घटनाविरोधी वागण्याला समर्थन देण्याचे आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर होण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
शेखर जोशी
रेड एफएमने जाहीर केले ‘बजाते रहो’ पुरस्कार
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
श्रोत्यांनी दिलेली पसंती आणि व्यक्त केलेल्या मतांवर आधारीत रेड एफएमचे ‘बजाते रहो’ हे आगळे पुरस्कार शुक्रवारी मुंबईत जाहीर करण्यात आले. बॉलीवूड, संगीत, क्रिकेट, टीव्ही आदी विविध क्षेत्रांसाठी रेड एफएमने हे आगळे पुरस्कार दिले.
बॉलीवूडकी दुनिया से या गटात ‘सुपर पीट फिल्म पुरस्कार’ द्रोणा या चित्रपटाला तर ‘बाप का नाम डुबो दिया’ पुरस्कार हरमन बावेजा याला जाहीर झाला. मयुर पुरी आणि बिमल ओबेराय यांना सिंग इज किंग या चित्रपटातील तुझे घोडी. या गाण्यासाठी ‘इस साल के या गाण्यासाठी जाहीर झाला.
प्रीतम याला ‘सबसे ज्यादा मेहनत करनेवाला संगीतकार’ हा पुरस्कार जाहीर झाला. अन्य जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे
क्रिकेट- बेस्ट ऑन फिल्ड ड्रामेबाज पुरस्कार-हरभजन सिंह (श्रीनाथ को सेरआम कान के नीचे बजाने के लिए), क्रिकेट गया तेल लेने पुरस्कार-विजय मल्ल्या (चिअर लेडी ना क्रिकेटर्स पेक्षा जास्त महत्व दिले म्हणून), मुंबईची शान-काम चालू आहे पुरस्कार- वांद्रे-वरळी सी िलक, ये जज्ज कैसे बन गया पुरस्कार-पायल रोहटगी (‘बिगबॉस’ मधील संभावना सेठ च्या कॅरेक्टरबाबत)
दिल्ली की शान आणि कोलकाता की शान साठी अनुक्रमे ब्ल्यु लाईन बस व बस ड्रायव्हर यांना जाहीर झाले.

लोकसत्याच्या ब्लॉगला वाचकांकडून

लोकसत्ता’च्या ब्लॉगला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचा आवाज जगभरात पोहोचविण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉगला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतातील राजकीय पक्ष आणि राजकारणी यांच्याविषयी ब्लॉगवर नोंदल्या गेलेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत. सर्व वाचकांनी ‘लोकसत्ता’ने अशा प्रकारचा ब्लॉग सुरू करून आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन केले आहे.
अॅड. शिरीष देशपांडे, रवी सोळुंके, व्ही. सतीश, मरकड मैत्रेय, अविनाश, राम गोगटे, योगेश नेने, राहुल जाधव, श्रीकांत लेले आणि असंख्य वाचकांनी ब्लॉगच्या संकल्पनेचे स्वागत केले असून हा एक चांगला उपक्रम आहे.
यातून जनमानसाची ताकद नक्कीच समजून येईल, असा विश्वासही काही जणांनी व्यक्त केला आहे. विनित पुणेकर यांनी ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणावर भाष्य करणारे खास सदर सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर विवेक जोशी यांनी ‘लोकसत्ता’ची ‘इंडियन पोलिटिकल लीग’ही लिंक निवडणूक आणि राजकीय विषयावरील भरपूर बातम्या देणारी साईट असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्ली येथील अनय जोगळेकर यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
मतदारांनी पहिल्यांदा उमेदवार कोण आहे ते पाहावे आणि त्यानंतरच विचार करून आपले मत द्यावे, असे आवाहन हेमंत कोठावडे यांनी केले आहे, तर राजेंद्र नंदा यांनी देशात त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येऊ नये म्हणून दोनच राजकीय पक्ष असावेत, अशी सूचना केली आहे.
नरेंद्र प्रभू यांनी म्हटले आहे की, लोकसभेत आपणच निवडून दिलेले खासदार असभ्य वर्तन करताना, गोंधळ घालताना दिसतात. भ्रष्ट किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आता तरी निवडून देता कामा नये. खासदारकी ही कुणाची मिरासदारी ठरू नये. राजकारण्यांना निवृत्तीचे वय नाही, त्यामुळे आता आपणच ते ठरवून त्यांना निवृत्त केले पाहिजे. तर प्रदीप यांनी, आज सर्वच पक्ष भ्रष्टाचारी झाले असून डावे-उजवे करणे कठीण काम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्मिता सोनावणे यांनी राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असून कॉंग्रेस पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी सूचना केली आहे. प्रशांत आगलावे म्हणतात की, ‘आयपीएल’चे क्रिकेट सामने आता भारताबाहेर होणार असल्याने ज्यांची ऐपत आहे ते लोक मतदानाचे कर्तव्य बाजूला ठेवून आफ्रिकेत क्रिकेट पाहायला जातील.
मग देशाचे वाटेल ते होवो, यांना काय? ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर ‘इंडियन पोलिटिकल लीग’ ही िलक असून त्यावर क्लिक केल्यावर निवडणुकी संदर्भातील बातम्या, लेख पाहता येतात. तिथे असलेल्या ‘ब्लॉग नोंदवा’ या बटनावर क्लिक केल्यास थेट ब्लॉग ओपन होऊन वाचकांना त्यावर आपली प्रतिक्रिया थेट नोंदवता येते. ‘लोकसत्ता डॉटकॉम’ हे संकेतस्थळ युनिकोडमध्ये असल्याने त्यावर आता थेट मायमराठीत लिहिता येणार आहे.

ठरावांना घटनात्मक वैधता नाही

संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मंजूर
झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नाही
शेखर जोशी
मुंबई, २४ मार्च
महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी खुल्या अधिवेशनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसह विविध ठराव मंजूर करण्यात आले. मात्र महामंडळाच्या घटनेनुसार खुले अधिवेशन हे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होत असते. या संमेलनाला अध्यक्षच नसल्याने मंजूर झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी एक उपचार म्हणून हे विविध ठराव दरवर्षी मंजूर केले जातात. त्यासाठी महामंडळाच्या विषय नियामक समितीची बैठक होऊन त्यात खुल्या अधिवेशनात जे ठराव घेण्यात येणार आहेत, त्यावर चर्चा होते. मात्र महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात विषय नियामक समितीची रचनाच पूर्ण झाली नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या ठरावांना काहीच अर्थ उरत नाही. महामंडळाच्या घटनेनुसार साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष, घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी, संमेलनाच्या महाकोशाचे विश्वस्त, संमेलनाध्यक्षांनी नियुक्त केलेले पाच सदस्य, महामंडळाचे सर्व पदाधिकारी आदी सर्व मंडळी विषय नियामक समितीच्या बैठकीला उपस्थित असणे आवश्यक आहे. महामंडळाच्या घटक व संलग्न संस्थांकडून जे ठराव संमेलनापूर्वी महामंडळाकडे आलेले असतात, त्यावर विषय नियामक समितीच्या बैठकीत चर्चा होऊन ठरावांना अंतिम रूप दिले जाते.
महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे भाषण संमेलनात वाचून न दाखविण्याचा आणि त्याच्या प्रती न वाटण्याचे ठरविण्यात आले. राजीनामा स्थगित ठेवण्यात आल्याने त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य गोष्टीही केल्या जाणार नसल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले होते. भाषण वाचून न दाखवणे आणि प्रती न वाटणे हे जर केले गेले नाही तर जे खुले अधिवेशन संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते आणि त्यात संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ठरावांचे वाचन आणि त्याला मंजुरी ही प्रक्रिया तरी का पार पाडण्यात आली, भाषण वितरित न करणे किंवा त्याचे वाचन न करणे या प्रमाणे ठराव मंजूर करण्याची प्रक्रियाही स्थगित का नाही ठेवली, असा सवाल या सूत्रांनी उपस्थित केला. त्यामुळेच महामंडळाच्या घटनेनुसार मंजूर झालेले ठराव अवैध ठरतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

संमेलनाटे सूप वाजले

समारोपाला अत्यल्प उपस्थिती ; संमेलनाचे सूप वाजले
सुनील माळी, शेखर जोशी, गणाधीश प्रभुदेसाई, अवधूत डोंगरे
महाबळेश्वर, २२ मार्च
सातारा जिल्ह्य़ातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार, ठराव, मनोगत, ज्येष्ठ कवी पुरुषोत्तम पाटील यांचा विशेष सत्कार आदी कार्यक्रमांनी ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. रविवार असूनही स्थानिक लोकांनी निरोप समारंभाकडे पाठ फिरविल्याने अत्यंत कमी उपस्थितांसमोर अखेर संमेलनाचे सूप वाजले. मान्यवरांची अनुपस्थिती व सत्कार समारंभ लांबल्यामुळे हा समारोप समारंभ आतापर्यंतच्या संमेलनांच्या समारोप समारंभांइतका दर्जेदार झाला नसल्याचे जाणवले.
कवितेच्या साधकाचा सन्मान
ग्रामीण भागामध्ये कवितेचा व्रतस्थपणे प्रसार करणारे साधक प्रा. पुरुषोत्तम पाटील यांचा हृद्य सत्कार संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ठाले-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.पाटील म्हणाले, ‘८२ व्या साहित्य संमेलनात हा ८२ वर्षांचा वृद्ध युवक आपल्यासमोर उभा आहे तो आभार मानण्यासाठी. १८८८ मध्ये नारायण नरहर फडणीस यांनी ‘काव्यरत्नावली’ या नावाचे मासिक सुरू केले. त्या मोठय़ा पावलावर पाऊल टाकून मी २४ वर्षांपूर्वी कवितेच्या प्रसारासाठी ‘कवितारथी’ हे द्वैमासिक खानदेशातून सुरू केले. त्याचे प्रकाशन रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याला अनेकांनी साथ दिली. महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला बसून मी माझे काम केले. हे काम कायम सुरू ठेवावे, असा कुसुमाग्रजांनीही निरोप पाठविला होता. कवितेविषयीची आस्था, प्रेम ग्रामीण भागातही पाहायला मिळाले. जुन्या कवींबरोबरच नव्या कवींनाही त्यात मी स्थान दिले. कुसुमाग्रज यांच्यावर मी तीन विशेषांक प्रकाशित केले. त्यातील दोन विशेषांक हे कुसुमाग्रज हयात असताना प्रसिद्ध करण्यात आले होते. सीमेवरील जवान, नक्षलवादी भागातील जनताही त्याचे वर्गणीदार आहेत. ‘कवितेचे फुलपाखरू बंदुकीच्या नळीवर आणून ठेवलंय!’ असे त्याचे वर्णन करण्यात आले. माझे दिवस थोडे राहिले असून, मी निराशावादी नाही, असे म्हणत प्रा. पाटील यांनी, बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती ऐकवल्या. प्रा. पाटील यांच्याप्रमाणेच ‘ग्रंथाली’चे संस्थापक दिनकर गांगल यांचाही सत्कार करण्यात येणार होता. मात्र गांगल हे कार्यक्रमास अनुपस्थित होते.
समारोप समारंभात प्रास्ताविक करताना स्वागत समितीचे उपाध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी संयोजन समितीच्या वतीने मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचा जाहीर निषेध केला. समारोप समारंभासाठी नियोजन बैठक सुरू असताना मेहता आत येऊन आरोप करू लागले. या वेळी त्यांना कोणीही धक्काबुक्की केलेली नाही. त्यांनी प्रसारमाध्यमाकडे खोटी माहिती देऊन संमेलनलाच गालबोट लावल्याचा आरोप प्रा. बावळेकर यांनी केला.
पुस्तकांच्या प्रत्येक दालनासाठी चार हजार रुपये खर्च आलेला आहे. तरीही संयोजन समितीने दीड हजार रुपयांचे नुकसान सोसून प्रकाशकांना अडीच हजार रुपयांना दालन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे प्रकाशकांना जास्त भाडे आकारण्याच्या सुनील मेहता यांच्या आरोपातही काही तथ्य नसल्याचे बावळेकर म्हणाले.
स्मरणिकेत मावळते अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांचे छायाचित्र नसल्याबद्दल खुलासा करताना बावळेकर म्हणाले की, स्मरणिकेसाठी आपले छायाचित्र व लेख पाठवून द्यावा, असे पत्र हातकणंगलेकर यांना पाठविले होते. पण हातकणंगलेकर यांनी समितीला पत्र पाठवून लेख पाठवू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. हे सांगताना बावळेकर यांनी हातकणंगलेकर यांचे पत्र वाचून दाखविले.
संयोजकांकडून दिलगिरी
सातारा जिल्ह्य़ातील साहित्य संस्था व साहित्यिकांना संमेलनाच्या नियोजनात सहभागी न केल्याची तक्रार आल्यानंतर समारोप समारंभाच्या सुरुवातीलाच संयोजकांच्या वतीने मोहन कुलकर्णी यांनी दिलगिरी व्यक्त केली.
पुस्तक प्रकाशन
समारोप समारंभात ज्येष्ठ कवी पुरुषोत्तम पाटील व कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते मोहन पुराणिक, डॉ. सुमन नवलकर, अशोक गारडे, प्रवीण मेहता, वामनराव आवळे, तसेच आध्यात्म विद्यापीठाच्या एका पाठय़पुस्तकातील ग्रंथाचे व सनातन संस्थेच्या ‘मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. शालिनी सॉफ्टवेअरने काढलेल्या ‘ज्ञानगंगा’ या सीडीचे प्रकाशन या वेळी झाले.
साताऱ्यातील कर्तबगार व्यक्तींचा सत्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सातारा जिल्ह्य़ातील कर्तबगार व्यक्तींचा समारोप समारंभात सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अरुण गोडबोले, जगन्नाथ शिंदे, राजेंद्र माने, विश्वास दांडेकर, शंकर सारडा, मधुकर नेने, किशोर बेडकीहाळ आदींचा समावेश होता.
प्रतिनिधींचे मनोगत
डॉ. आनंद यादव यांची ‘संतसूर्य’ कादंबरी प्रकाशित करणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसची नोंदणी पुणे महापालिकेने रद्द करावी, अशी मागणी प्रतिनिधींच्या वतीने बोलताना किसन कुऱ्हाडे यांनी केली व वारकऱ्यांच्या भूमिकेवरही टीका केली.