विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने
अमेरिका साहित्य परिषदेची स्थापना
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी
फेब्रुवारी महिन्यात सॅनहोजे येथे भरणाऱ्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिका आणि जगभरात मराठी भाषा
आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी अमेरिका साहित्य परिषदेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांनी आज दादर येथे पत्रकार परिषदेत दिली. जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर संमेलनाच्या कार्यक्रम आणि व्यवस्थेच्या गुणात्मक दर्जात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. मात्र तरीही हे संमेलन यशस्वी होईलच, असा दावाही देवकुळे यांनी केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र मंडळ बे एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य महामंडळाच्या सदस्या उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष वि. भा. देशपांडे, राजा-राणी ट्रॅव्हल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील, प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ, अमेरिकेतील उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार, ललित महाडेश्वर आदी उपस्थित होते.संमेलनाच्या नंतरही अमेरिका साहित्य परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेत आणि संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणी मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी तसेच तेथील साहित्यिक व साहित्य रसिकांसाठी काहीना काही उपक्रम सुरू राहतील. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात अनिवासी भारतीय साहित्यिकासाठी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगून देवकुळे म्हणाले की, अमेरिका साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अमेरिकेतील उद्योजक आणि ‘ही ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.या संमेलनासाठी भारतातून सॅनहोजे येथे जाणाऱ्या साहित्य रसिकांकरिता ‘राजा-राणी ट्रॅव्हल्स’ या पर्यटन संस्थेची सोय करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले की, आत्तापर्यंत ३२५ जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी ८० जणांना व्हिसा मिळाला आहे. १५० ते २०० जणांच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. तर डॉ. ठाणेदार म्हणाले की, मराठी साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित करून ते जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमेरिका साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. अमेरिकेत सध्या २० ते २५ मराठी लेखक असून त्याची काही पुस्तकेही प्रकशित झाली आहेत. हे संमेलन इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात थेट पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment