लता मंगेशकर पुरस्काराचे उद्या वितरण
मुंबई ७ जानेवारी / प्रतिनिधी
राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण शुक्रवार, ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.०० वाजता मुंबईत एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. २००८ या वर्षीचा पुरस्कार दिवंगत पाश्र्वगायक महेंद्र कपूर यांना जाहीर झाला होता. पुरस्कार वितरणापूर्वीच कपूर यांचे निधन झाल्यामुळे आता या पुरस्काराचा स्वीकार कपूर यांच्या पत्नी प्रवीणलता आणि मुलगा रोहन हे करणार आहेत. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय पेट्रोलियममंत्री मुरली देवरा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी महेंद्र कपूर यांच्या गाण्यावरील ‘बिते हुए लम्हो की कसक’ हा कार्यक्रम सादर होणार असून या कार्यक्रमात उदित नारायण, अलका याज्ञिक, जगजितसिंग, शब्बीर कुमार हे गायक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यालयीन वेळेत यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्र तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय विस्तार भवन येथे मिळू शकतील.
साहित्य अकादमीच्या ‘कथासंधी’मध्ये भारत सासणे
मुंबई, ७ जानेवारी / प्रतिनिधी
साहित्य अकादमीतर्फे आयोजित ‘कथासंधी’ या कार्यक्रमाच्या येत्या १० जानेवारी रोजी होणाऱ्या मालिकेत ज्येष्ठ लेखक भारत सासणे सहभागी होणार आहेत. सासणे यांच्या कथावाचनानंतर श्रोत्यांना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
हा कार्यक्रम साहित्य अकादमी बेसमेंट हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व) येथे सायंकाळी सहा वाजता होणार असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य अकादमीचे पश्चिम विभागीय सचिव के. एस. राव यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment