मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील
महिला कर्मचारी रस्त्यावर उतरणार
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी
विविध सोयी-सुविधांचा अभाव आणि वारंवार पाठपुरावा करूनही या मागण्यांकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील महिला कर्मचारी आता रस्त्यावर उतरणार आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी काही महिला कर्मचारी येत्या ६ जानेवारी पासून प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत.
कर्मचाऱ्यांची बदली आणि बढतीबाबतही संस्थाचालकांकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्याबाबत कोणतेही समान सूत्र नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर पश्चिम शाखेत तर तेथील कर्मचारी आणि येणाऱ्या सभासदांसाठी प्रसाधनगृह आणि साध्या पिण्याच्या पाण्याची सोयही नसल्यामुळे सर्वाचे विशेषत: महिलांचे खूप हाल होत आहेत. ही वास्तू ग्रंथसंग्रहालयाच्या मालकीची असूनही तेथे दुकानदार असलेल्या भाडेकरूंचे वर्चस्व आहे. ग्रंथसंग्रहालयात प्रवेश करण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर तर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे.
जुने असलेले प्रसाधनगृह मोडकळीस आल्याने त्याचा वापर कोणी करत नाही. तात्पुरते प्रसाधनगृह तयार करण्यात आल आहे. मात्र तेथे जाण्याच्या मार्गात भाडेकरू असलेल्या दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने तेथे जाणे गैरसोयीचे ठरत आहे. या वाचनालयात अभ्यासिकेची सोय असल्याने अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे येत असतात. मात्र प्रसाधन गृह आणि पिण्याच्या पाण्याच्या अभावी हाल होत आहेत.
त्यामुळे एकूणच ग्रंथसंग्रहालयातील कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या ६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात येणार आहे. दादर-पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजल्यापासून हे उपोषण सुरू होणार आहे. भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या मुंबई मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment