ज्येष्ठ साहित्यिक बाळ सामंत यांचे निधन
‘सामंत’शाही संपली! अग्रलेख पाहा
मुंबई, १८ जानेवारी / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक बाळ सामंत यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात न्यूमोनियाच्या आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कलाताई, पुत्र विजय, राजीव व संजीव, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साहित्यातील योगदानाबद्दल सामंत यांना २००४ साली ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते. बाळ सामंत प्रामुख्याने विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. ‘मस्करी’, ‘गोंधळ’, ‘खिरापत’, ‘नवरा-बायको’, ‘करामत’, ‘खुशमस्करी’ या त्यांच्या पुस्तकांनी वाचकांना खूप हसविले. बालगंधर्व यांच्या जीवनावरील ‘तो एक राजहंस’, ‘हिटलर - एक महान शोकांतिका’, ‘प्रेमग्रंथ’, ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ‘युवराज’, ‘मरणात खरोखर जग जगते’, ‘मैफल’, ‘पुनर्जन्म एक शोध’ इत्यादी वेगळ्या विषयावरील पुस्तकांचेही त्यांनी लेखन केले. रिचर्ड बर्टन यांच्या जीवनावरील ‘शापित यक्ष’ हे त्यांचे चरित्र खूप गाजले.
२७ मे १९२४ रोजी जन्मलेल्या बाळ सामंत यांनी रुईया महाविद्यालयामधून कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळविली. ‘लोकसत्ता’मधील ‘न संपणाऱ्या गोष्टी’ या बाळ सामंत यांच्या स्तंभाला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे ‘नवशक्ती’ दैनिकातूनही त्यांनी स्तंभलेखनही केले होते. राज्य शासनाच्या जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment