साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीत अत्यल्प मतदान
मुंबई, १६ जानेवारी / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी केवळ दोनच उमेदवारांत लढत झाल्याने मतदान अत्यल्प झाल्याची चर्चा मराठी साहित्य वर्तुळात आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ७९२ मतदारांपैकी फक्त ४९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, विदर्भ साहित्य संघ-नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद-औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ-मुंबई या आणि मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक व बडोदा येथील महामंडळाच्या घटकसंस्था तसेच संमेलन ज्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे, तेथील आयोजक संस्था यांच्या सदस्यांना या निवडणुकीत मतदान करता येते. या एकूण मतदानात महाबळेश्वर येथील आयोजक संस्थेच्या साठ पैकी ५७ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. टपालाद्वारे होणाऱ्या मतदानाचे प्रमाणही कमी होते.
गेल्या वर्षी एकूण मतदान ८५ टक्के झाले होते. यंदा हे प्रमाण अवघे ६० ते ६२ टक्के आहे. मात्र यंदाच्या वर्षी जाणवलेली एक विशेष बाब म्हणजे सर्व मतदारांना यंदा मतपत्रिका वेळेत मिळाल्या. मतपत्रिका वेळेवर मिळाल्या नाहीत किंवा डुप्लिकेट मतदान पत्रिका पाठवा अशा तक्रारी यंदा खूप कमी आल्या. गेल्या वर्षी या तक्रारींचे प्रमाण जास्त होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत कवडे यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment