अ. भा. मराठी साहित्य संमेलन २० ते २२ मार्चला
मुंबई , १२ जानेवारी / प्रतिनिधी
यंदाचे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत महाबळेश्वर येथील पोलीस ग्राऊंड
मैदानात होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. महाबळेश्वर सारख्या छोटय़ा गावात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा हा ‘ प्रयोग ’ असल्याचेही ठाले-पाटील म्हणाले.
गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघात झालेल्या पत्रकार परिषदेस महामंडळाचे कार्यवाह कुंडलिक अतकरे , साहित्य संघाच्या पदाधिकारी उषा तांबे , सुहासिनी किर्तीकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या १६ जानेवारी ८२ व्या साहित्य संमेलनाच्या नव्या अध्यक्षाची निवड जाहीर होणार असल्याचे सांगून ठाले-पाटील म्हणाले की , गेल्या काही वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनाला प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. महाबळेश्वर येथे कदाचित तेवढी गर्दी होणार नाही. उद्घाटनाच्या कार्यक्रमास सुमारे सात ते आठ हजार रसिक उपस्थित असतील तर दोन ते अडीच हजारांपर्यंत संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी होईल , अशी अपेक्षा आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी कला क्षेत्रातील व्यक्ती असेल. तीन दिवसांच्या संमेलनासाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी महाबळेश्वर येथील हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था केली जाणार असून निवास , भोजनासह एका व्यक्तीसाठी १ हजार २५० रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रतिनिधी नोंदणीसाठी लवकरच सुरुवात होणार आहे.संमेलनाचे कार्यक्रम दोन मंडपांमध्ये होणार असून त्यापैकी बहुतांश कार्यक्रम हे मुख्य मंडपातच होतील. ग्रंथिदडी , निमंत्रितांचे काव्यसंमेलन , प्रसिद्ध नाटककाराची प्रकट मुलाखत तसेच महाराष्ट्र राज्याचे भाषिक धोरण या विषयावर महाचर्चा , संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्यातील सामाजिकता , महिलांच्या कर्तृत्वाचे यथायोग्य चित्रण मराठी साहित्यात उमटले आहे का , कलावंतांचे मराठी वाचन आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. बालमेळावा , निवडक नवोदित कवींचे संमेलन आदी कार्यक्रमही या वेळी होणार असल्याचे ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment