Sunday, April 19, 2009

मराठीतील उत्तम साहित्याच्या अनुवादासाठी आता साकडे

मराठीतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषेत अनुवादित होण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनाच साकडे
मुंबई, २१ जानेवारी/प्रतिनिधी
मराठीतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने पावले टाकायला सुरुवात केली असल्याची घोषणा तात्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात केली होती. मात्र तीन वर्षांनंतरही अशा प्रकारचे कोणतेही पाऊल राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत उचलले गेले नाही. त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्रीपदावरून मुख्यमंत्री झालेल्या अशोक चव्हाण यांनी आता तरी तातडीने आपल्या जाहीर घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे २४ मार्च २००५ रोजी मुंबईत राज्य वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास त्यावेळेस सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणारे अशोक चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलतांना चव्हाण यांनी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने पावले टाकायला सुरुवात केली असून पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यावर कार्यवाही झालेली दिसून येईल, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या या वाक्यावर उपस्थित पुरस्कार विजेते आणि रसिक साहित्यप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली होती. दिवंगत साहित्यिक आणि नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. केशव मेश्राम यांनी नाशिकच्या संमेलनात संमेनाध्यक्षपदावरून आपले भाषण करताना मराठीतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषकांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचाच संदर्भ घेऊन राज्य वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात चव्हाण यांनी त्याबाबत घोषणा केली होती. हिंदी, कन्नड किंवा अन्य भाषेतील चांगले साहित्य मराठी भाषेत अनुवादित होत असते. मात्र त्या प्रमणात मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषांमधून अनुवादित त्या घोषणेनंतर काही महिन्यांनी ‘लोकसत्ता’ ने याचा पाठपुरावा केला होता. त्या वेळी अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नसल्याचे प्रा. मेश्राम यांनी सांगितले होते. आता तीन वर्षांनंतर याचा मागोवा घेतला असता मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी राज्य शासनातर्फे कोणतीही समिती किंवा मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन केली नसल्याचे साहित्य वर्तुळातून सांगण्यात आले. केवळ टाळ्या घेण्यासाठी चव्हाण यांनी ही घोषणा त्या कार्यक्रमात केली होती का, असा सवाल मराठी साहित्य वर्तूळातून उपस्थित करण्यात येत आहे. त्या घोषणेप्रमाणे चव्हाण यांनी पावले टाकली असती तर अशा प्रकारचे काम सुरू होऊन काही पुस्तकांचा अन्य भाषात अनुवादही झाला असता.
दरम्यान मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषेत अनुवादित होण्यासाठी आपण एक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता, असे राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे एप्रिल २००६ मध्ये मी हाती घेतली. त्यापूर्वीच मी हा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment