कलानगरच्या कलाकारांच्या कलाकृतींचे आज प्रदर्शन!
मुंबई, २५ जानेवारी / प्रतिनिधी
वांद्रे येथील कलानगर को. ऑ. हौ. सोसायटीमध्ये सध्या राहणारे किंवा या पूर्वी राहून गेले चित्रकार, शिल्पकार आदी सभासदांच्या कलाकृतींचे प्रदर्शन उद्या २६ जानेवारी रोजी कलानगरमधील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडेआठवाजता ज्येष्ठ चित्रकार वसंत परब यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून ते रात्री नऊ पर्यंत खुले आहे.
२६ जानेवारी रोजी कलानगर को. ऑ. हौ. सोसायटीचा वर्धापन दिन असतो. कलानगर येथील रहिवासी असलेल्या वि. ना. ऊर्फ दादा आडारकर, प्रा. व्ही. आर. आंबेकर आणि प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. हे जन्मशताब्दी वर्ष आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कलानगर को. ऑ. हौ. सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण नाईक यांनी दिली. कलानगरधील एन. एस. बेंद्रे, माधव सातवळेकर, व्ही. एस. गुर्जर, र. कृ. पारकर, कृ. ग. धैर्यवान, ना. ग. पानसरे आदी दिवंगत तसेच सध्या हयात असलेल्या आणि नवीन पिढीतील काही चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून पुढील तीन दिवस हे प्रदर्शन सुरू ठेवण्याचा आमचा विचार आहे. प्रदर्शनात ज्या कलाकृती मांडण्यात येणार आहेत, त्या प्रत्येकाच्या स्वत:च्या संग्रहातील असून वीस कलाकारांच्या चाळीस कलाकृती येथे पाहायला मिळतील, असेही नाईक यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment