Sunday, April 19, 2009

मराठीचे अभिमानगीत

मराठी अस्मितेसाठी आता मराठीचे अभिमानगीत!
मुंबई, १८ फेब्रुवारी / प्रतिनिधी
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही, असे म्हटले जाते. त्याला इतरही अनेक कारणे असली तरी मराठी लोकांमध्ये मराठीबाबत असलेली उदासिनता हेही एक कारण आहे. त्यामुळेच मराठी लोकांमधील मराठी भाषेबाबतची ही उदासिनता दूर करण्यासाठी आता संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांचे काही सहकारी पुढे सरसावले आहेत. मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी मराठीचे अभिमानगीत तयार केले जाणार असून येत्या १ मे रोजी या अभिमानगीताची सीडी प्रकाशित केली जाणार आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो
जागलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढय़ा जगात माय मानतो मराठी
ही ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात लिहिलेली कविता अभिमानगीत म्हणून निवडण्यात आली आहे. मराठीतील नामवंत गायक आणि शंभर वादकांच्या साथीने ही कविता ध्वनिमुद्रित केली जाणार आहे.
मराठीचा अभिमान रुजविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या चळवळीचा भाग म्हणून या प्रकल्पासाठी कुणाही प्रायोजकाची आर्थिक मदत न घेता लोकसहभागातून निधी उभा केला जाणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले. ही संकल्पना मित्रमंडळींमध्ये बोलून दाखवली असता, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
परदेशस्थ काही मराठी भाषिकांनी ५७० डॉलर्सची मदत केली मुंबई आणि राज्यातून सुमारे दोन लाख रुपये जमा झाले आहेत. किमान दोन हजार लोकांनी पाचशे रुपये देऊन या प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन करून इनामदार यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, या सीडीबरोबर एक पुस्तिका प्रकाशित केली जाणार असून त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आणि या प्रकल्पात सहभागी झालेल्यांचा नामनिर्देश असेल.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले धनादेश ‘मराठी अस्मिता’ या नावाने काढून मराठी अस्मिता, द्वारा कौशल इनामदार, १०२, त्रिवेणी, शुचिधाम, फिल्म सिटी मार्ग, िदडोशी बस आगाराजवळ, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३ या पत्यावर पाठवावेत, असे आवाहनही कौशल इनामदार यांनी केले.
www.marathiasmita.org या संकेतस्थळावर इच्छुकांना अधिक माहिती मिळू शकेल.

No comments:

Post a Comment