बिल्लो बार्बर’च्या प्रसिद्धीसाठी शाहरुख आणि जावेद हबीब यांचे ‘हातात हात’
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
बॉलिवूडमधील आमीर आणि शाहरुख या दोन खानांमधील स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय असते. आमीर खानच्या ‘गजनी’ नंतर आता शाहरुखच्या ‘बिल्लो बार्बर’ची हवा तापायला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब आता ‘बिल्लो बार्बर’च्या भारतातील आणि परदेशातील प्रमोशनसाठी शाहरुख खानला मदत करणार आहेत.‘गजनी’च्या प्रमोशनसाठी चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारावर ‘गजनी’च्या लूकमधील आमीरचे पुतळे उभे करणे, नवी दिल्ली येथे आमीरने स्वत: उपस्थितांपैकी काहींची ‘गजनी’ स्टाईल हजामत करणे असे काही प्रसिद्धीचे मार्ग अवलंबले होते. आपल्या बहुचर्चित ‘बिल्लो बार्बर’साठी शाहरुखनेही हा नवा मार्ग चोखाळला आहे. शाहरुखच्या ‘रेड चिली एण्टरटेंटमेंट’ची निर्मिती असलेल्या हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘बिल्लो बार्बर-जावेद हबीब’असे संयुक्त बॅनर्स, भित्तीपत्रके देशभरात सुमारे १०६ ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच चित्रपटाच्या प्रसिद्धीचा एक भाग म्हणून देशभरातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये ‘बिल्लो बार्बर’ झोन तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी जावेद हबीब यांनी प्रशिक्षित केलेले हेअर स्टाईल तज्ज्ञ काही सेवा विनाशुल्क देणार आहेत. तसेच चित्रपटाच्या तिकीटाबरोबर देशभरातील जावेद हबीब यांच्या सलूनमध्ये उपयोगी पडतील, अशी काही सवलत असलेली कुपन्सही देण्यात येणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment