तुकारामांचे अभंग आणि साहित्य आता दक्षिण भारतीय भाषांमध्येही!
मुंबई, २९ जानेवारी / प्रतिनिधी
मराठी संत मांदियाळीतील एक प्रमुख संत तुकाराम यांची अभंगगाथा आता संस्कृत, मराठी आणि काही परदेशीभाषांसह दक्षिणेतील कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आदी दक्षिण भारतीय भाषांमध्येही पोहोचली आहे. त्यामुळे संत तुकाराम हे खऱ्या अर्थाने विश्वसंत झाले आहेत.
मराठीमध्ये www.tukaram.com ही वेबसाईट लोकप्रिय असून या साईटवर तुकाराम गाथेतील अभंग, तुकाराम यांचे चरित्र, छायाचित्रे आणि अन्य साहित्य देण्यात आले आहे. दिलीप धोंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही वेबसाईट सुरू केली असून ही तुकाराम गाथा अभ्यासकांना इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, स्पॅनिश आदी परदेशी भाषांमध्येही या साईटवर उपलब्ध आहे. भारतातील गुजराथी, हिंदूी, कोकणी, बंगाली, या प्रादेशिक भाषांमध्येही याचा अनुवाद झाला आहे. आता ही गाथा दक्षिणेतील विविध भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे. कन्नड भाषेत विरुपाक्ष कुलकर्णी यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र, लहान मुलांसाठी चित्ररूप अभंग तसेच बहिणाबाई यांचे अभंग पाहायला मिळतील. कोकणीमध्ये सुरेश आमोणकर यांनी लिहिलेले चरित्र असून बंगाली भाषेत रवींद्रनाथ टागोर यांनी अनुवादित केलेले अभंग आहेत. गुजराथी विभागात निळकंठ पंचभाई यांनी तुकारामांचे अनुवादित केलेले ८०० अभंग असून केदारनाथ यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र आहे.
तामिळ भाषेत शास्तागोपाळ यांनी अनुवादित केलेले, तेलगु भाषेत भालचंद्र आपटे यांनी अनुवादित केलेले तर मल्याळम आणि ओरिसा भाषेतील चरित्राचा अनुवाद अनुक्रमे विश्वनाथ अय्यर व खगेश्वर महापात्रा यांनी केला आहे. तेलगु, ओरिसा आणि मल्याळम भाषेसाठी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या चरित्रावरून अनुवाद करण्यात आला आहे.
संकेतस्थळावरील मराठी विभागात राम बापट, सदानंद मोरे, दिलीप धोंडगे, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे तर हिंदूी विभागात महात्मा गांधी, इंग्रजीत दिलीप चित्रे हिंदूीत श्रीराम शिकारखाने, आनंदप्रकाश दीक्षित, संस्कृतमध्ये पंडित महादेव शास्त्री ओक आदींचे लेख आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment