Sunday, April 19, 2009

बेस्टच्या प्रवासात कवितांची साथ

बेस्ट’च्या प्रवासात कवितांची साथ!
शेखर जोशी
रेल्वे किंवा बेस्ट बसमधला प्रवास म्हणजे गर्दी, बस वाहकासोबत सुट्टय़ा पैशांवरून होणारी वादावादी
आणि असेच काही तरी समीकरण प्रवाशांच्या मनात पक्के तयार झालेले असते. बेस्ट प्रशासनाने काही बसगाडय़ांमधून टीव्ही किंवा एफएम रेडिओची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील काही निवडक कवितांची भर पडणार आहे. मुंबईत येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या काळाघोडा साहित्य महोत्सवाचा एक भाग म्हणून दक्षिण मुंबईतील काही बेस्ट बसगाडय़ांमध्ये येत्या एक-दोन दिवसांत या कविता लावण्यात येणार आहेत.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रत्येकी चार अशा एकूण बारा कविता बेस्ट बसगाडय़ांमधून प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मराठीतील कवितांमध्ये हेमंत दिवटे (आता नवरा-नवरी खेळू), मंगेश नारायणराव काळे (आत्महत्या) सचिन केतकर (ब्लॅक अ‍ॅण्ड टीव्हीला उद्देशून एक भावगीत), वर्जेश सोळंकी (आपल्या खिशातल्या पाकिटात) यांच्या कवितांचा समावेश आहे. तर हिंदीतील कवितामंध्ये बोधीसत्व, त्रिलोचन नागार्जुन, सर्वेश्वर आदींचा समावेश आहे. या बारा कवितांची पोस्टर्स तयार करण्यात आली असून ती दक्षिण मुंबईत फिरणाऱ्या १०८, १३८, १ तसेच अन्य क्रमांकांच्या बेस्ट बसगाडय़ांमध्ये लावण्यात येणार आहेत.
निवड करण्यात आलेल्या सर्व कविता या वेगळ्या विषयांवरील आणि प्रवाशांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. मंगेश काळे यांची कविता शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर विषयावरील आहे. लंडनच्या मेट्रो रेल्वेत अशा प्रकारे कविता लावण्यात आलेल्या आहेत. आपल्या येथे ‘पायोनिअर पब्लिसिटी’च्या सहकार्याने आम्ही असा प्रयोग करत असल्याचे हेमंत दिवटे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

No comments:

Post a Comment