Sunday, April 19, 2009

नूतन यांच्या आठवणींचा चांद फिर निकला

नूतन यांच्या आठवणींचा ‘चांद फिर निकला’!
प्रतिनिधी
चित्रपट रसिकांसाठी अजुनही ‘दिल की धडकन’
असलेल्या माधुरी दीक्षित हिच्या उपस्थितीच्या सुखद धक्क्यात, माधुरीच्या ओघवत्या आणि उत्स्फूर्त मनोगतात आणि एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपले अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित झालेल्या अजरामर गाण्यांवर आधारित कार्यक्रमात रसिक चिंब न्हाऊन निघाले आणि नूतन यांच्या आठवणींचा ‘चांद फिर निकला’ अशीच भावना उपस्थितांची झाली.
‘स्क्रीन’ प्रस्तुत आणि ‘जीवनगाणी’आयोजित ‘चांद फिर निकला’हा कार्यक्रम मंगळवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात झाला. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. याच कार्यक्रमात ललिता ताम्हाणे लिखित ‘नूतन असेन मी.. नसेन मी..’ या पुस्तकाचे प्रकाशन माधुरी दीक्षित आणि ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असलेल्या बॅंक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक एन. नरेंद्र, लेखिका ललिता ताम्हाणे, पुस्तकाचे प्रकाशक अशोक मुळ्ये ( डिंपल प्रकाशन) आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी दीक्षित हिचा प्रसाद महाडकर आणि शर्मिला महाडकर यांच्या हस्ते काळी पैठणी आणि चांदीचा करंडा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजाध्यक्ष यांनी राजाध्यक्ष आणि समर्थ कुटुंबियांचे गेल्या शंभर वर्षांचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगून नूतन यांच्या बद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला. नतून यांच्यामुळेच आपण ‘स्क्रीन प्ले’ लिहायला लागल्याचे आवर्जून सांगून इंग्रजी, हिंदूीत कविता करणाऱ्या नूतन, भजने करणाऱ्या आणि रात्री फोनवरून ऐकवणाऱ्या नूतन, एक माणूस म्हणून त्यांचा असलेला मोठेपणा यांच्या आठवणी सांगितल्या. तर माधुरी दीक्षित यांनी नूतन या एक अभिनेत्री म्हणून खूप मोठय़ा होत्याच परंतू त्या माणूस म्हणूनही खूप चांगल्या होत्या. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक निरागसता आणि सहजता होती. त्यांचा हा स्वभाव माझ्यासाठी प्रेरणादायी असून मी सुद्धा जीवनात त्यांच्या सारखा वागण्याचा प्रयत्न करत आहे. मृत्यूने त्यांना आपल्यातून नेले असले तरी रसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान आजही कायम असल्याचे सांगितले.
लेखिका ललिता ताम्हाणे यांनी पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा सांगून नूतन यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपले पाय हे नेहमीच जमिनीवर कसे ठेवले पाहिजेत, त्याचा नूतन या आदर्श होत्या, असेही ताम्हाणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी केले. दरम्यान नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आलेली विविध गाणी सुवर्णा माटेगावकर, चिंतामणी सोहनी, नेहा वर्मा यांनी सादर केली. याचे संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड यांचे होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संदीप पंचवाटकर यांनी केले. ‘वो चांद फिर निकला’ या गाण्याने सुरू झालेली ही मैफल तुमही मेरे मंदिर तुम ही मेरी पूजा, गोरा गोरा अंग लई ले, तेरा जाना दिलके अरमानोंको लूट जाना, दिल की नजर से नजरों के दिलसे, छोड दे सारी दुनिया किसी के लिये, फूल तुम्हे भेजा है खत में, काली घटा छाय मोरा जिया धडकाय, निगाहें मिलाने को जी चाहता है अशी आणि यांसारखी अनेक गाणी सादर झाली.

No comments:

Post a Comment