Sunday, April 19, 2009

बाबुल मोराला मिळाली सैगल यांच्या नातवाची दाद

बाबुल मोरा’ ला मिळाली सैगल यांच्या नातवाची दाद!
प्रतिनिधी
दिवंगत गायक आणि अभिनेते के. एस सैगल यांनी आपल्या आवाजात म्हटलेली ‘जब दिल ही टूट गया’, ‘दिया जिसने दिल’ ही आणि या सारखी अनेक गाणी आजही सैगलप्रेमी आणि गानरसिकांच्या ओठावर आहेत. गायक विनायक जोशी आणि त्यांचे सहकारी सैगल गाण्यांचा ‘बाबुल मोरा’ हा कार्यक्रम सादर करतात. आजपर्यंत या कार्यक्रमाचे चाळीस प्रयोग झाले असले तरी गेल्या रविवारी विलेपार्ले येथे झालेला ‘बाबुल मोरा’चा प्रयोग खास म्हणावा लागेल. कारण या कार्यक्रमास सैगल यांचे नातू सलीम र्मचट स्वत: उपस्थित होते. त्यांची खास कौतुकाची थाप ‘बाबुल मोरा’ला मिळाली.
सैगल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आशा भोसले फॅन ग्रूपतर्फे १८ जानेवारी रोजी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात ‘बाबुल मोरा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खास निमंत्रित म्हणून सैगल यांची कन्या नीना र्मचट यांचे सुपुत्र आणि सैगल यांचे नातू सलिम उपस्थित होते. काही जण एखादा कार्यक्रम करतात आणि त्यानंतर थांबतात. मात्र जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझे आजोबा सैगल यांच्या गाण्यांवरील ‘बाबुल मोरा’ या कार्यक्रमाचे केलेले चाळीस प्रयोग ही त्यांची खरी सैगल भक्ती आहे. मी आजवर ऐकलेल्या सैगल गाणाऱ्या गायकांमध्ये विनायक जोशी यांचे स्थान वरच्या क्रमांकावर असल्याचे गौरवोद्गार सलिम यांनी यावेळी बोलताना काढले. आमच्या कार्यक्रमास सैगल यांचे नातू स्वत: उपस्थित असल्याचे कळल्यानंतर मला अक्षरश: गहिवरून येऊन डोळ्यात आनंदाश्रू आले. माझ्या आजवरच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याची प्रतिक्रिया विनायक जोशी यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
या वेळी ‘बाबुल मोरा’च्या कलाकारांतर्फे आशा भोसले फॅन ग्रूपचे शैलेश देशपांडे आणि संजय साठे यांचा नौशाद यांची सैगल कविता भेट देऊन सत्कार करण्यात आला. गायिका अपर्णा हेगडे आणि विनायक जोशी यांनी गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांना सैगल युगात नेले. कार्यक्रमासाठी गिरीश प्रभू, उदय चितळे, संदीप मयेकर, गौतम नाईक यांनी संगीतसाथ केली तर मिलिंद जोशी यांनी निवेदन केले.

No comments:

Post a Comment