नवविवाहितांसाठी ‘चिंगी’ची अनोखी भेट!
प्रतिनिधी
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘चिंगी’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने राज्यातील नवविवाहित जोडप्यांना एक अनोखी भेट मिळणार आहे. ‘चिंगी’चा पहिला प्रिव्ह्यू चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञांबरोबर पाहण्याची संधी प्रथम येणाऱ्या प्रवेशिकांपैकी पहिल्या एक हजार जोडप्यांना मिळणार आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधीत विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी आपल्या लग्नाचे छायाचित्र किंवा लग्नपत्रिका आणि दूरध्वनी क्रमांक आदी माहिती पाठविणे आवश्यक आहे. ‘स्त्री भ्रूणहत्या’ या ज्वलंत सामाजिक विषयावर हा चित्रपट बेतला असून याची निर्मिती इसरानी प्रॉडक्शन आणि अनिता इसरानी प्रस्तूत पी. पी. क्रिएशन्सतर्फे करण्यात आली आहे.
या चित्रपटात मिलिंद गवळी, गिरिजा ओक, रवींद्र बेर्डे, इला भाटे, अरुण भडसावळे, उज्ज्वला जोग आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या असून नीलम शिर्के, आदिती सारंगधर, नागेश भोसले, डॉ. विलास उजवणे, चारुशीला वाच्छानी, श्वेता शिंदे आदी कलाकार पाहुण्या कलावंतांच्या भूमिकेत आहेत.
या विषयासंदर्भात नवविवाहित जोडप्यांची भूमिका खूपच महत्त्वाची असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची भूमिका बदलावी आणि होणारे मूल हे फक्त ‘मुलगा’ नसावे आणि ‘मुलगी’ असली तरी तिचे आनंदाने स्वागत करावे. मुलगी झाली म्हणून त्या स्त्रीची कुचेष्टा किंवा छळ होऊ नये. केवळ मुलगी आहे म्हणून स्त्रीभ्रूणाची हत्या होऊ नये, असा उद्देश या चित्रपटामागे आहे.
‘चिंगी’ चित्रपटाच्या प्रिव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी नवविवाहितांनी आपल्या प्रवेशिका इसरानी फिल्म्स, १/३, शेरे पंजाब सोसायटी, गुरुद्वाराजवळ, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००९३ या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.aamchichingi.com या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment