Sunday, April 19, 2009

ग्रामीण साहित्यपीठाच्या शंकराचार्यांचा गौरव

ग्रामीण साहित्यपीठाच्या शंकराचार्याचा गौरव’!
मुंबई, १७ जानेवारी / प्रतिनिधी
डॉ. आनंद यादव यांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन घडवले असून ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे ‘ग्रामीण साहित्य पीठाच्या शंकराचार्याचा’ गौरव असल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांनी सांगितले की, डॉ. यादव यांनी जे ग्रामीण साहित्य लेखन केले ते वास्तव जीवनाशी भीडणारे आहे. ग्रामीण जीवन, वातावरण आणि सर्व परिसर नेमकेपणाने साहित्यात आला आहे. साहित्यिक वर्तूळात त्यांना ‘ग्रामीण साहित्य पीठाचे शंकराचार्य’ असे म्हटले जाते. त्यामुळे या निमित्ताने त्यांचा यथार्थ गौरव झाला आहे. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, डॉ. यादव हे माझे आवडते लेखक आहेत. ग्रामीण साहित्य लेखक म्हणून ते ओळखले जात असले तरी ग्रामीण साचेबद्धपणात त्यांचे लेखन कधीच बंदिस्त झाले नाही. कारण कोणताही एक वाङमयप्रकार त्यांनी लोकप्रिय फॅशन म्हणून त्यांनी स्वीकारला नाही. आपल्या लेखनातून त्यांनी सतत माणसांचा शोध घेतला आणि जो लेखक असा शोध सातत्याने घेत असतो, तो आणि त्याचे लेखन कधीही संपत नाही. म्हणूनच डॉ. यादव यांचे लेखन अजूनही ताजे आहे. ज्येष्ठ समिक्षिका आणि साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी सांगितले की, डॉ. यादव यांचे सर्व प्रकारचे लेखन हे चांगल्या गुणवत्तेचे आणि सकस असे असून त्यांच्या निवडीने मनापासून आनंद झाला. डॉ. यादव यांचे लेखन हे आपल्या मातीतील असून वेगवेगळ्या क्षेत्रात जाून, तेथील घटनांचे, माणसांचे संशोधन करून आपले लेखन केले आहे.

No comments:

Post a Comment