सुमनस्वरां’ची बरसात!
मुंबई, १५ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या मराठी आणि हिंदूी गाण्यांचे गारूड अद्यापही रसिकांच्या मनावर आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पाश्र्वगायन थांबवले असले आणि लाईमलाईटमधून त्या दूर गेल्या असल्या तरी आजही त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यांवर भरभरून प्रेम करणारे रसिक आहेत. याचीच प्रचिती शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात पाहायला मिळाली. एका कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी आणि आयोजकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन खास रसिकांसाठी साक्षात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातून स्वरधारा बरसल्या आणि या ‘सुमन’स्वरधारांत रसिक चिंब झाले.. निमित्त होते ते नवचैतन्य प्रकाशन आणि फोच्र्युननेट एण्टरटेंटमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे. प्रसिद्ध निवेदिका आणि सूत्रसंचालिका मंगला खाडिलकर यांनी कल्याणपूर यांच्यावर लिहिलेल्या ‘सुमनसुगंध’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीकुमार शिंदे, ज्येष्ठ संगीतकार आणि गायक यशवंत देव तसेच संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले. कल्याणपूर यांची सांगितिक कारकिर्द आणि जीवनप्रवास या पुस्तकातून उलगडण्यात आला आहे. या वेळी व्यासपीठावर नवचैतन्य प्रकाशनाचे शरद मराठे, चौगुले समुहाचे रवींद्र आवटी व दि शामराव विठ्ठल को. ऑ. बॅंकेचे रत्नाकर गोकर्ण, मंगला खाडिलकर उपस्थित होते. उपस्थित सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात सुमनताई यांनी काहीतरी गुणगुणावे किंवा काही गाऊन दाखवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या विनंतीचा आदर करत सुमनताईंनी ‘या देवी सर्व भुतेषू..’ अशा स्वरांनी सुरुवात करून मृदुलकरांनी छेडीत तारा.., एकदाच यावे सखया तुझे गीत कानी.., चंदनाचे हात.., ठहरिये होश मे आके.., आनंद मनी माईना.. आणि अन्य काही गाण्यांची ध्रुवपदे सादर केली आणि साऱ्या सभागृहाने त्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. जीवनातील विविध रंग आणि आठवणी या पुस्तकातून उलगडल्या गेल्या असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, रसिकांनी माझ्यावर आणि माझ्या गाण्यांवर भरभरून प्रेम केले असून त्यांची मी सदैव ऋणी आहे. हे प्रेम कधीच कमी होऊ नये. आजचा कार्यक्रम म्हणजे सुरेल योग असून या पुस्तकाच्या निमित्ताने भूतकाळात गेलेल्या गायिकेला पुन्हा वर्तमानात आणण्याचे काम केले असल्याचे देव म्हणाले तर सुमनताई या माझ्या ‘गॉडमदर’ असून आज मी जो काही आहे, तो त्यांच्यामुळेच आहे. सुमनताई यांनी गाणे सोडू नये, अजूनही गावे. त्या गाणार असतील तर नवीन संगीत रचना करण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची माझी तयारी असल्याचे पत्की यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी व हिंदूी चित्रपट संगीत आणि मराठी भावसंगीताचा इतिहास उलगडला गेला आहे. या कार्यक्रमापूर्वी कल्याणपूर यांनी गायलेल्या गाण्यांचा ‘सुमनसुगंध’ हा कार्यक्रम सादर झाला. याची संकल्पना, निवेदन आणि लेखन मंगला खाडिलकर यांचे होते. मंदार आपटे, माधुरी करमरकर, सायली जोशी, विद्या यांनी सुमनताई यांची गाजलेली गाणी सादर केली. याचे संगीत संयोजन आप्पा वढावकर यांचे होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कल्याणपूर यांनी गायलेली काही हिंदूी गाण्यांची झलक सादर करण्यात आली. दिल एक मंदिर है, ना ना करके प्यार तुम्हीसे कर बैठे, ना तुम हमे जानो, आपके दिल मे बिठा लू, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर, न जाने तुम थे, न जाने हम थे, अजहून आए न बालम, सावन बिता जाए अशी काही सोलो आणि द्वंद्व गीते ऐकविण्यात आली आणि रसिकांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट सभागृहात दुमदुमत राहिला..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment