Sunday, April 19, 2009

पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात सखी मंद झाल्या तारका

नक्षत्रांचे देणे’ मध्ये ‘सखी मंद झाल्या तारका’
पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात!
मुंबई, २० जानेवारी / प्रतिनिधी
पं. भीमसेन जोशी हे नाव उच्चारले की आपल्या मनात त्यांनी गायलेले अनेक अभंग किंवा चित्रपटातील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ अशी गाणी उमटतात. दमदार आवाज हे त्यांचे वैशिष्टय़. मात्र पं. भीमसेन जोशी यांनी चक्क भावगीत म्हटले आहे. ते सुद्धा आपल्याला माहीत असलेले, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र पंडितजींनी गायलेले ‘सखी मंद झाल्या तारका’ हे भावगीत झी मराठीवरील ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
‘सखी मंद झाल्या तारका’ हे गाणे दिवंगत गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांनी म्हटले असून ते प्रसिद्धही आहे. मात्र ते भीमसेन जोशी यांनीही म्हटले असल्याचे या कार्यक्रमात ऐकायला मिळणार असून त्यासह पंडितजींनी गायलेली कान्होबा तुझी घोंगडी, जोहार मायबाप जोहार, रम्य ही स्वर्गाहून लंका, टाळ बोले चिपळीला, इंद्रायणी काठी. माझे माहेर पंढरी आदी गाणी तसेच ‘तू है महंमदसा दरबार’ ही चीज, कलावती आणि रागेश्री या दोन रागांच्या मिश्रणातून पंडितजींनी स्वत: तयार केलेल्या कलाश्री रागातील ‘धन धन भाग सुहाग तेरा’ ही बंदिशही या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे. झी मराठीवर काही वर्षांपूर्वी चित्रपट, नाटय़, संगीत आदी कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या कार्याचा आढावा घेणारा ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम सादर झाला होता. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर झी मराठीतर्फे हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला असून त्यातील पहिला कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला होता. कार्यक्रमातील पहिले नक्षत्र पं. भीससेन जोशी यांच्यावर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय आपटे आणि नीना कुलकर्णी यांनी केले आहे. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास, त्यांचे शिष्य उपेंद्र भट, श्रीकांत देशपांडे, माधव गुडी, आनंद भाटे, आरती अंकलीकर-टिकेकर आणि शंकर महादेवन यांनी या कार्यक्रमात गाणी सादर केली आहेत.
पंडित हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. जसकाज, पं. अरविंद गजेंग्रगडकर, प्रभा अत्रे, श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर आदींनी पंडितजींविषयी सांगितलेल्या आठवणीही या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment