इतिहासाचे सातत्याने पुर्नलेखन व्हावे-डॉ. अरुण टिकेकर मॅजेस्टिक गप्पा
प्रतिनिधी : इतिहासाबद्दलची आपली संकल्पना अधिक विवेकाची, सहानुभूतीपूर्ण आणि शत्रुलाही झुकते माप देणारी असावी. तसेच इतिहासाचे सातत्याने पुर्नलेखन केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर यांनी विलेपार्ले येथे केले.
मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मॅजेस्टिक गप्पांची सुरुवात डॉ. टिकेकर यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. ज्येष्ठ समीक्षिका डॉ. मीना वैशंपायन आणि पत्रकार अंबरिश मिश्र यांनी डॉ. टिकेकर यांची मुलाखत घेतली. मॅजेस्टिक गप्पांचे यंदाचे २६ वे वर्ष आहे.
आपण इतिहासात रमत नाही तर अतिहासाचे ओझे वाहतो, असे सांगून डॉ. टिकेकर म्हणाले की, इतिहासाकडे आपण डोळसपणेही पाहत नाही. इतिहासकार ज्या दृष्टीने त्याकडे बघणार तसा तो इतिहास लिहिणार. प्रत्येक पिढीला इतिहास हा नव्याने लिहावासा वाटतो. तसा तो लिहिला जातो. आजचे निकष पूर्वीच्या पिढीला लावले तर सर्वत्र नकारात्मकच दिसायला लागते. इतिहास वस्तुनिष्ठ नसतो. जितके जवळ जाता येईल, तितके त्याच्या जवळ गेला पाहिजे.
भारतीय समाज इतिहासातकाळातच रमतो, तरीही आपल्याकडे इतिहासाची निकोप दृष्टी नाही, या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते.
नुसती भाषिक चळवळ करून चालणार नाही तर सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणून व्यापक असे सांस्कृतिक धोरण ठरवले पाहिजे. लेखक हा स्वत:च स्वत:चा सेन्सॉर व्हायला तयार नाही. एखादा चांगला लेखकही वाईट कादंबरी लिहू शकतो. जे वाचन आपल्या जीवनावर आणि विचारांवर प्रभाव टाकू शकत नाही, ते कसले वाचन, असा सवालही डॉ. टिकेकर यांनी या वेळी बोलताना केला.
मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. मॅजेस्टिक गप्पांना २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी डॉ. टिकेकर यांच्या हस्ते झाले. या स्मरणिकेसाठी मॅजेस्टिक गप्पांनी आम्हाला काय दिले आणि मॅजेस्टिक गप्पांकडून आमच्या अपेक्षा या विषयावर लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. यातील रवींद्र लागू, सीमा देवस्थळी आणि निवेदिता लागू यांना अनुक्रमे १ हजार, ७५० आणि ५०० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment